शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या
By Admin | Published: June 23, 2017 12:07 AM2017-06-23T00:07:47+5:302017-06-23T00:07:47+5:30
राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जपुरवठा करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
राकाँतर्फे निवेदन : सुप्रिया सुळे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जपुरवठा करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. यासंदर्भात गुरूवारी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे.
सध्या अमरावतीसह राज्यभरातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. ३ वर्षांपासून सतत नापिकी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय दहा हजारांच्या मदतीच्या अटी व शर्ती जाचक आहेत. व बँकांचीसुध्दा परिस्थिती बिकड आहे. त्यामुळे शेतकरी शेती पेरण्यास त्यांची कुठलीही व्यवस्था नाही. पडीक शेती अधिक प्रमाणात राहू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती राहिल्यास जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकतात, ही सर्व बाब लक्षात घेता शासनाने विनाविलंब शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व पूर्णपणे शेतकऱ्यांना कर्जसुद्धा द्यावे, अशी मागणी खा.सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी विद्यानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, वसंत घुईखेडकर, वसुधा देशमुख, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, बाबा राठोड, भास्कर ठाकरे, अनिल ठाकरे, अरूण गावंडे, गणेश खारकर, नितीन शेरेकर, प्रदीप राऊत, नंदकिशोर रेखाते, सतीश ढोरे, प्रमोद झाडे, स्मिता घोगरे, संगीता ठाकरे आदी उपस्थित होते.