‘या नभाने या भुईला दान द्यावे...’
By Admin | Published: June 17, 2016 11:59 PM2016-06-17T23:59:52+5:302016-06-17T23:59:52+5:30
मागील तीन वर्षांपासून अनियमित, अल्प पावसामुळे पाणीटंचाई व दुष्काळामुळे बळीराजा होरपळून निघाला आहे.
गजानन मोहोड अमरावती
मागील तीन वर्षांपासून अनियमित, अल्प पावसामुळे पाणीटंचाई व दुष्काळामुळे बळीराजा होरपळून निघाला आहे. यावर्षी ‘या नभाने या भुईला दान द्यावे’ अशी आर्त हाक बळीराजाने दिली आहे.
जिल्ह्यात पावसाचे जून ते आॅक्टोबरदरम्यान ५० दिवस मानण्यात येतात. या दिवसांत सरासरी किमान ८५० मि.मी. पावसाची अपेक्षा असते. मागीलवर्षी या पाच महिन्यात फक्त ३२ दिवस पाऊस पडला. वर्षभरात पावसाची ७२१ मि.मी.नोंद झाली. पावसाची ही टक्केवारी ७९ टक्के इतकी आहे. १४ जूनला मान्सूनचे आगमन झाले. दोन दिवस पडल्यानंतर तीन आठवडे पाऊस खंडित राहिला. यामुळे खरिपाची पेरणी रखडली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.
उशिरा पावसाने ६० दिवसांच्या अल्प कालावधीचे मूग व उडदाचे पीक बाद तर खंडित पावसामुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाले. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जमिनीतील आर्द्रता कमी झाली. रबीचा हंगामदेखील गारद झाला. सन २०१४-१५ च्या खरीप हंगामात जून- आॅक्टोबरदरम्यान केवळ ३६ दिवस पाऊस पडला. जिल्ह्यात ७८० मि.मी. पाऊस पडला. परंतु त्यावर्षीदेखील महिनाभर पाऊस खंडित राहिला. नेमकी सोयाबीन कापणी, मळणीच्या काळात मात्र संततधार पावसामुळे सोयाबीन जागीच थिजले. परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील मिळाला नाही.
सन २०१३-१४ च्या हंगामात जून ते आॅक्टोबर या कालावधीत तब्बल ६२ दिवस पाऊस पडला. पावसाची ८१५ मि.मी. सरासरी असताना १०९६ मि.मी. पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी १३५ टक्के होती. त्यामुळे यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा बळीराजा करीत आहे.