मेळघाटातील विस्थापित आदिवासींना जमिनी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:58 AM2018-01-12T00:58:00+5:302018-01-12T00:58:11+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्प पुनर्वसितांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा तसेच विस्थापित आदिवासी शेतकºयांना जमिनी देण्यात याव्यात, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प पुनर्वसितांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा तसेच विस्थापित आदिवासी शेतकऱ्यांना जमिनी देण्यात याव्यात, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे केली.
खासदारांच्या कार्यालयाकडून उशिरा रात्री प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासमवेत विभागीय आयुक्त कार्यालयात खासदारांनी बैठक घेतली. काही दिवसांपासून मेळघाटात विस्थापित आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्याबाबत खा. अडसुळांनी ही बैठक बोलाविली. नुकतेच तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४८ कोटींचा निधी प्राप्त झाल्याचे खासदारांनी विभागीय आयुक्तांना सांगितले. आदिवासी बांधवांचे स्थलांतर करताना त्यांना पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी विभागीय आयुक्तांना केल्या.
मेळघाटातील आदिवासींच्या पुनर्वसनाबाबत जिल्ह्याचा खासदार म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणात शासन सकारात्मक असून, लवकरात लवकर आदिवासींची ही मागणी मान्य केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी यांची भेट घेणार असल्याचे खा. अडसुळांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, महानगरप्रमुख प्रशांत वानखडे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण अब्रुक आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.