विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव अन् भारतरत्न द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:55 AM2017-12-29T00:55:19+5:302017-12-29T00:56:19+5:30
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे अफाट कार्य व सर्वज्ञ क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान पाहता, शासनाने त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे व बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे,
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे अफाट कार्य व सर्वज्ञ क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान पाहता, शासनाने त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे व बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, असे दोन ठराव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवार, २७ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सभेत पारित केले.
भाऊसाहेबांच्या ११९ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सभेत शहर काँग्रेस कमिटीने महत्त्वाचे ठराव घेतले. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने चौबळ वाडा येथील पक्ष कार्यालयात सर्वप्रथम भाऊसाहेबांना जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
किशोर बोरकर यांनी आपल्या मनोगतातून राज्यघटना समितीचे सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात यावे, बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, भाजपक्षाचे राज्यमंत्री अनंत हेगडे यांनी देशाचे संविधान बदलविण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करणारे ठराव मांडले. वरील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
सभेला उपस्थित आयएमएचे अध्यक्ष बी.आर. देशमुख म्हणाले की, डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून काम करताना देशभरातील शेतकºयांना न्याय दिला. याशिवाय शिक्षणक्षेत्रात एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असताना भाऊसाहेबांनी त्या काळात वाङ्मयात पीएच.डी. करून प्रस्थापितांना आपल्या बुद्धिचातुर्याचा परिचय दिला. गोरगरीब, उपेक्षित व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून खेड्यापाड्यात बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. देशातल्या शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी भारत कृषक समाजाची स्थापना करून शेतकऱ्यांना संघटित केल्याचे ते म्हणाले.
यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू गणेश पाटील, प्रल्हाद ठाकरे, भय्यासाहेब निचल, अर्चना सवाई, अखिल भारतीय युवक काँग्रेस सरचिटणीस भैया पवार, आसिफ मंसुरी, बाबर कुरेशी, ऋषिराज मेटकर, अभिनंदन पेंढारी, यासीर भारती, संकेत कुलट, संकेत बोके, भाऊराव पोटे, निसार अहमद मंसुरी, नदीम मुल्ला, वंदना थोरात, अनिला काझी, कुंदा अनासाने, हसिना शाह, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे संचालन दीपक हुंडीकर यांनी केले. आभार प्रदर्शन नसीम खान यांनी केले.