‘आधी नोटा तर द्या, मगच करतो मतदान’, नाइलाजाने परतले निवडणूक अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 06:28 AM2024-04-14T06:28:46+5:302024-04-14T06:29:00+5:30
वर्धा लोकसभा मतदारसंघातील मोर्शी तालुक्याच्या रिद्धपुरातील १७ लोकांनी गृह मतदानासाठी अर्ज केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मोर्शी (अमरावती): गृह मतदानाची सुविधा असल्याने मतदान घेण्यासाठी घरी आलेल्या पथकाकडे वयोवृद्धाने चक्क पैशाची मागणी केल्याने ते परतले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पथक आले. तेव्हाही वृद्धाचा हाच धोशा कायम असल्याने नाइलाजाने पथकाला आल्यापावली परत फिरावे लागले. हा प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघातील मोर्शी तालुक्याच्या रिद्धपुरातील १७ लोकांनी गृह मतदानासाठी अर्ज केले. निवडणूक विभागाचा चमू शुक्रवारी येथे दाखल झाला. गावातील १७ पैकी १४ जणांनी मतदान केले. एका मतदाराने मतदानास नकार दिला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पैसे दिले तरच मतदान करणार, असे या मतदाराने बजावले. शनिवारी पुन्हा चमू रिद्धपूरला पोहोचला. पण, ते बधले नाहीत. अधिकाऱ्यांनी त्यांची बरीच मनधरणी केली; परंतु वृद्धाचा धोशा कायम राहिला. ग्रामस्थांकडून ही माहिती फुटली. तथापि, निवडणूक अधिकारी याचा इन्कार करीत आहेत.
दिव्यांग व वृद्धांच्या गृह मतदान प्रक्रियेसाठी पथक रिद्धपूरला पोहोचले होते. १७ पैकी १४ मतदारांनी मतदान केले. एका ८५ वर्षीय मतदाराने मतदान करण्यास नकार दिला. पण त्याने माझ्यासमोर पैसे मागितले नाहीत. आर. एस. चांदेवार, एआरओ, मोर्शी