विद्यार्थी, तरुणांना बेरोजगार भत्ता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:17+5:302021-04-19T04:11:17+5:30
अमरावती : कोरोनामुळे गत वर्षापासून विद्यार्थी, तरुण बेरोजगार प्रचंड बिकट परिस्थितीतून जात आहे. लाखो तरुण सध्या बेरोजगार आहेत. बेरोजगारीला ...
अमरावती : कोरोनामुळे गत वर्षापासून विद्यार्थी, तरुण बेरोजगार प्रचंड बिकट परिस्थितीतून जात आहे. लाखो तरुण सध्या बेरोजगार आहेत. बेरोजगारीला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्यात. पण, या सगळ्याबाबत प्रशासन व सरकार विचारच करीत नसल्याने दिसत आहे. सरकार व प्रशासनाच्या अजेंड्यावर असणारी नोकर भरती तर सध्या फक्त त्या समान विकास कार्यक्रमाच्या कागदावरच राहिली आहे. शासनाचे मेगा भरतीचे आश्वासन काल्पनिक झाले आहे. त्यामुळे तातडीने बेरोजगार भत्ता देऊन राज्य सरकारने तरुणांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून मनसेचे शहराध्यक्ष हर्षल ठाकरे यांनी विद्यार्थी, तरुणांची व्यथा मांडली. आता नव्याने पुन्हा राज्यात संचारबंदी लागू केली. अनेक समूह, घटकांसाठी शासनाने पॅकेज जाहीर केले. मात्र, या पॅकेजमधून तरुण, विद्यार्थी वंचित आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने इतर सर्वच आर्थिक दुर्बल घटकांसाठी ज्या पद्धतीने शासनाने पॅकेजची घोषणा केली त्याच धर्तीवर राज्यातील बेरोजगार विद्यार्थी, तरुणांसाठी बेरोजगार भत्ता तातडीने सुरू करावा किंवा "पुढील महिनाभरात सर्व प्रलंबित भरती प्रक्रिया पूर्ण करून पदभरतीची जाहिरात, परीक्षेची तारीख, निकालाचा दिनांक आणि नेमणूक दिनांक जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. कोरोना महामारीमुळे तरुणांत बेरोजगारी वाढली तसेच गेल्या दोन वर्षांपासून सरळ सेवा भरतीची प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थी व तरुणांचे खच्चीकरण होत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताकरिता प्रयत्न करावे, अशी मागणी मनसेने केली आहे.