वैभवशाली जिनिंग प्रेसिंग झाली भकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:01 PM2018-04-29T22:01:06+5:302018-04-29T22:01:06+5:30
तालुक्यातील एकमेव पणन महासंघाची जिनिंग-पे्रसिंग भंगार अवस्थेत असून, कापूस खरेदी केंद्राअभावी या जिनिंग-प्रेसिंगला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातील एकमेव पणन महासंघाची जिनिंग-पे्रसिंग भंगार अवस्थेत असून, कापूस खरेदी केंद्राअभावी या जिनिंग-प्रेसिंगला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील पांढरे सोने खासगी व्यापाऱ्यांना पडत्या भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. या जिनिंग-प्रेसिंगला अच्छे दिन केव्हा येणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
एकेकाळी नगदी पीक म्हणून तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रामाणात घेतले जात होते. त्यामुळे अमरावती येथे कापूस एकाधिकार मंडळाची बाजारपेठदेखील प्रसिद्ध होती. काळी कसदार जमीन व अनुकूल वातावरणामुळे कापसाचे उत्पादन तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत होते. घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, देऊरवाडा येथील कापसाची प्रत संपूर्ण जिल्ह्यात उच्च मानली जायची. अमरावती येथील कापूस खरेदी केंद्रावर या गावांच्या नावानेच कापसाला चांगले भाव मिळत होते. ब्रिटिश काळात चांदूर बाजार येथे पांगरकर यांचे जिनिंग होते, असे सांगितले जाते. सहकार विभागातून तत्कालीन आमदार भैयासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात पहिल्यांदा सहकारी तत्त्वावर जिनिंग-प्रेसिंग तयार करण्यात आली. गुजरातमधून सन १९०६ मध्ये प्रेसिंग मशीन आणण्यात आली. येथे तयार होणाºया कापसाच्या गाठी सर्वात उत्तम मानल्या जायच्या. त्यानंतर ती जिनिंग-प्रेसिंग पणन महासंघाने खरेदी केली.
कृषी विभाग दखल घेणार काय ?
या परिसरात आजही दर्जेदार कापसाचे उत्पादन होते. पूर्णा व चारघड प्रकल्पामुळे ओलिताची सोय असल्यामुळे अचलपूर येथील फिनले मिलला लागणारा उच्च प्रतीचा, लांब धाग्याचा कापूस येथे उत्पादित होऊ शकतो.याबाबतच मर्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने पाऊल उचलणे गरजेचे आहे.
जिनिंग खासगी व्यक्ती चालविते भाडेतत्त्वावर
या जिनिंग-प्रेसिंगमध्ये शेकडो मजुरांना रोजगार मिळत होता तसेच शेतकऱ्यांना आपला कापूस विकण्यासही सोयीचे झाले होते. कापसाचा एकाधिकार असताना या प्रेसिंगचे वैभव पाहण्याजोगे होते. पणन महासंघाने या प्रेसिंगमध्ये रेचे लावले होते. परिसरात कापसाच्या गाठी ठेवण्यासाठी मोठे गोडाऊन बनविले होते. त्याकाळी परिसराचे वैभव मानली जाणाºया या-जिनिंग प्रेसिंगची आज दुर्दशा झाली आहे. पणन महासंघाच्या चुकीच्या धोरणांमुळे ही जिनिंग-प्रेसिंग खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.