पीएसआयच्या आशीर्वादाने गोवंश वाहतूक ?

By admin | Published: May 10, 2017 12:05 AM2017-05-10T00:05:18+5:302017-05-10T00:05:18+5:30

एकीकडे राज्य शासनाने गोवंश वाहतुकीवर बंदी घातली असताना दुसरीकडे एका पोलीस उपनिरीक्षकाने या कायद्याला हरताळ फासण्याचा प्रयत्न चालविला आहे.

Goa cattle transport with the blessings of PSI? | पीएसआयच्या आशीर्वादाने गोवंश वाहतूक ?

पीएसआयच्या आशीर्वादाने गोवंश वाहतूक ?

Next

मोठे अर्थकारण : वरिष्ठांना कुणकुण लागल्याने थातूरमातूर कारवाईचा देखावा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकीकडे राज्य शासनाने गोवंश वाहतुकीवर बंदी घातली असताना दुसरीकडे एका पोलीस उपनिरीक्षकाने या कायद्याला हरताळ फासण्याचा प्रयत्न चालविला आहे. सदर पीएसआय गोवंश वाहतुकीच्या मोबदल्यात मोठे अर्थकारण साधत असल्याची माहिती पुढे आली आहे. ही बाब पोलीस प्रमुखांपर्यंत पोहोचल्यामुळेच त्या उपनिरीक्षकाने मंगळवारी पहाटे कारवाई करून स्वत:वरील बालंट टाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकारही समोर आला आहे.
पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्याकडे गुन्हे शाखेचा पदभार असताना पोलीस आयुक्तांच्या निर्देशाने गोवंशाची वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते.
शहरातील नांदगाव पेठ, लालखडी रोड, भातकुली रोड व वलगाव पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करण्याचे निर्देश होते, तर बडनेरा येथे एक पथक पेट्रोलिंगसाठी देण्यात आले. काही दिवस नाकाबंदी करून पोलिसांनी अनेक वाहनांवर कारवाई केली. मात्र, कालांतराने कारवाई मंदावली. शहरात पुन्हा गोवंशाची वाहतूक सुरू झाल्याचे काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईवरून लक्षात येते. दरम्यान गोवंश वाहतुकीसाठी एक पोलीस उपनिरीक्षकाने गोवंश वाहतूक करणाऱ्यांशी संगनमत करून चिरीमिरी घेण्याचा प्रकार चालवला.
हनुमान जयंतीच्या दिवशी पोलिसांद्वारे आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमात दोन पोलीस निरीक्षकांच्या चर्चेदरम्यान संबंधित पोलीस उपनिरीक्षक पैसे घेऊन गोवंश वाहतुकीस पाठबळ देत असल्याची बाब पुढे आली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.

मध्यप्रदेशातून आणली जातात जनावरे
अमरावती : संबंधित पीएसआय कारवाईच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती. माहिती मिळताच पीएसआयने मंगळवारी अवैध वाहतुकीवर कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून गोवंश मिनीट्रकद्वारे अमरावतीत आणली जाते. शहरात कत्तल केल्यानंतर जनावरांचे मांस वाहनात टाकून नागपुरी गेट परिसरातून भातकुलीकडे जाणाऱ्या सुकळीअंतर्गत मार्गावरून नेले जाते. त्यानंतर मूर्तिजापूरमार्गे अकोला मार्गापर्यंत पोहोचतात. तेथून हायवेने विविध दिशेने रवाना होतात. या कामासाठी घेतलेले पैसे प्रभात चौकातील एका छत्री दुरुस्ती करणाऱ्या इसमाजवळ दिले जातात. ट्रकमधून वाहतूक करणे जड जात असल्याने आता त्यांनी मिनीट्रकद्वारे वाहतूक होत आहे.

गोवंश वाहतुकीसंदर्भात पोलीस काही गैरप्रकार करीत असतील तर तपास करू. खात्री केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.

Web Title: Goa cattle transport with the blessings of PSI?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.