जलसंधारणातून गावाच्या कायापालटचे ध्येय ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:47 AM2018-04-25T01:47:11+5:302018-04-25T01:47:11+5:30
पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी स्पर्धा हाच उद्देश न ठेवता, जलसंधारणातून गावाचा कायापालट करण्याचे ध्येय ठेवून कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मंगळवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी स्पर्धा हाच उद्देश न ठेवता, जलसंधारणातून गावाचा कायापालट करण्याचे ध्येय ठेवून कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मंगळवारी केले. तालुका प्रशासनाने या कामांसाठी भरीव प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पानी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाकडून धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील सहभागी गावांत कामे सुरू आहेत. स्पर्धेसाठी ३३४ गावांतील प्रतिनिधींनी प्रशिक्षण घेतले आहे. या गावांतील नियोजन व अडचणींबाबत प्रशासन, संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा खत्री, मनपा आयुक्त हेमंत पवार, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) डी. आर. काळे, भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष सुदर्शन जैन, सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, बाबासाहेब राऊत, फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक अतुल काळे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी गावांत गत पंधरवड्यात जलसंधारणाची कामे सुरू झाली. उर्वरित एका महिन्याच्या कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग मिळवत प्रशासनाने जोरदार प्रयत्न करावेत. सहभागी गावांकडून अपेक्षित काम व खचार्बाबत अर्ज येताच उपविभागीय अधिकाºयांनी त्याला तात्काळ मान्यता द्यावी. स्पर्धेचा कालावधी लक्षात घेता कामे गतीने व्हावीत. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील परिस्थिती लक्षात घेऊन तेथील मजुरांना मनरेगा अंतर्गत वेतन दिले जाईल, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
भारतीय जैन संघटना देणार यंत्रसामग्री
धारणी तालुक्यासाठी खंडवा व बऱ्हाणपूर येथून यंत्रे मागविण्यात आली आहेत. प्रत्येक गावाला जेसीबी, पोकलॅन आदी यंत्रसामग्री पुरविण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या गावात चांगले काम होत असेल, तर केवळ गुणांच्या तांत्रिकतेत न अडकता तिथे यंत्र दिले जाईल, असी ग्वाही भारतीय जैन संघटनेचे सुदर्शन जैन यांनी दिली. गावात झालेल्या प्रत्येक कामाची नोंद अॅपमध्ये घ्यावी, अशी सूचना उपल्हिाधिकारी काळे यांनी केली
स्पर्धेचा ४५ दिवस राहणार कालावधी
वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, यंदाचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख रुपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक तसेच प्रत्येक तालुक्यातील आघाडीवरील गावाला प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत श्रमदान तसेच यंत्रांच्या साहाय्याने जलसंधारणाद्वारे पाणी साठवण क्षमता निर्माण करणे हा स्पर्धेचा उद्देश आहे.