गुळाच्या गुऱ्हाळाने शेतीला नवी दिशा!
By admin | Published: May 15, 2017 12:20 AM2017-05-15T00:20:53+5:302017-05-15T00:20:53+5:30
स्थानिक संगत संस्थाननजीक वास्तव्यास असलेले नत्थुराव पायघन यांनी सुरू केलेला गुळाचा व्यवसाय शेतीसाठी नवसंजीवनी ठरला आहे.
उपक्रम : अंजनगावच्या पायघन कुटुंबाचा प्रक्रिया उद्योग
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : स्थानिक संगत संस्थाननजीक वास्तव्यास असलेले नत्थुराव पायघन यांनी सुरू केलेला गुळाचा व्यवसाय शेतीसाठी नवसंजीवनी ठरला आहे. शेतीला नवी दिशा देत ऊसावर प्रक्रिया करून नव्या पिढीसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
परतवाडा मार्गावर पायघन कुटुंबाचे तीन एकर शेतात गुऱ्हाळ तयार केले आहे. दहा क्विंटल ऊसाचा पाच क्विंटल रस एकावेळी कढईत शिजवला जातो व त्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर चुना, एरंडी तेल व भेंडीच्या बियाचे चुर्ण टाकले जाते आणि अमिट गोडीचा गूळ याच्यात ओतला जातो. एक क्विंटल गूळ एकावेळी तयार होतो. दोन हजार रुपयांच्या दहा क्विंटल उसापासून प्रक्रिया करून पाच हजार रुपयांचा गूळ मिळतो. खर्च वजा झाल्यावर उत्पन्न मिळते.
यामुळे आपण गुळनिर्मितीचा सोपा पर्याय निवडला आणि त्यात मेहनत व सातत्य राखून हा व्यवसाय यशस्वी रितीने तिसऱ्या पिढीला दिला असे ज्ञानदेव पायघन यांनी सांगितले. पन्नास वर्षापूर्वी वडीलांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता नवी रस काढण्याची मशीन आणि ईतर पुरक सामान आणून त्यांनी आधुनिक केला. मात्र त्यात निर्माण झालेले उसाचे चिपाड पुन्हा जाळण्यासाठी वापरून खर्चात मोठी बचत केली जाते. आता हा व्यवसाय त्यांची तिसरी पिढी सांभाळत आहे.
रसायनांचा वापर नाही
येथे तयार झालेल्या गुळात कोणताही रासायनिक पदार्थ टाकला जात नाही. केवळ नैसर्गिक घटक टाकले जातात म्हणून या गुळाची गोडी कायम आहे. दररोज येथे अंदाजे शंभर किलो गूळ विकले जाते. शिवाय ऊसाच्या पाचरापासून उत्कृष्ट खत, रस काढण्यावर उरलेले ऊसाचे पाचट जाळल्या जाते. पण त्यापासून उत्कृष्ट प्रतीचे कंपोष्ट खत तयार होऊ शकते व त्यात उच्च दर्जाचे अन्नघटक पिकांना मिळतात, असे पायघन कुटुंबाने सांगितले.
रस्त्यावरील दुकानदारीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. केवळ कल्पक्ता वापरण्याची गरज आहे. आम्ही झुनका भाकर, रसवंती, मसाला गूळ आदी तयार करून त्याची विक्री करीत आहोत. चारोळी, खारक, नारळाचा किस आदी पदार्थ टाकून मसाला गूळ तयार केला आहे. याला चांगली मागणी आहे. प्रत्येकाने रोजगाराची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करावे.
- ज्ञानदेव पायधन, शेतकरी