स्थायी विकास हेच ध्येय
By admin | Published: October 8, 2014 10:59 PM2014-10-08T22:59:10+5:302014-10-08T22:59:10+5:30
रस्ते-नाल्यांचे बांधकाम, पायाभूत सुविधांची निर्मिती हे तर लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे; तथापि हे करीत असताना नागरिकांचा स्थायी विकास घडवून आणणे हे माझे प्रमुख ध्येय आहे,
अमरावती : रस्ते-नाल्यांचे बांधकाम, पायाभूत सुविधांची निर्मिती हे तर लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे; तथापि हे करीत असताना नागरिकांचा स्थायी विकास घडवून आणणे हे माझे प्रमुख ध्येय आहे, असा अजेंडा बडनेरा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुलभा संजय खोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केला.
बडनेरा मतदारसंघात काँग्रेसला खाते उघडण्याची २५ वर्षांनंतर पहिल्यादांच संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सुलभा खोडके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मतदारसंघाच्या विकासाची 'ब्ल्यू प्रिंट' मांडली. धर्मनिरपेक्ष विचारसरणीची कास धरुनच राजकारण, समाजकारणाला प्रारंभ केला. यात कुठेही खंड पडू दिला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. केवळ दोन, चार रस्ते बांधले म्हणजे विकास होत नाही. त्याकरिता व्यक्तीकेंद्रित विकास करावा लागतो. व्यक्तीच्या सामाजिक जाणिवांना हात घालत विकासाची पायाभरणी करणे हे भविष्याचे उद्दिष्ट आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, कामगार कल्याण योजना, रमाई घरकूल योजना, अपंग- निराधार योजना अशा अनेक शासनाच्या योजनांचा गरजूंना लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार, विधवांना योजनांची मदत मिळावी. युवकांना रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र निर्माण करुन या केंद्रांना २४ तास इंनटरनेट सुविधा दिली जाईल. मतदारसंघात अधिक उद्योगधंदे आणण्यास प्राधान्य राहील. गावखेड्यात रस्ते, शिक्षणाच्या सोई उपलब्ध नाहीत, हे महत्त्वपूर्ण प्रश्न सोडविण्यास अग्रक्रम राहील, हाच विकासाचा प्रमुख मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
पेढी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा कळीचा असून या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन करुन जमीन आणि घरांना शासनस्तरावर मोबदला देण्यास कटीबद्ध राहील, असे त्या म्हणाल्या.