बीटींचा आम्हाला आशीर्वाद !
By admin | Published: January 16, 2017 12:07 AM2017-01-16T00:07:25+5:302017-01-16T00:07:25+5:30
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बी.टी. देशमुखांचा आम्हाला आशीर्वाद आहे, ...
संजय खोडके : पत्रपरिषदेतून व्यक्त केला विश्वास, काँग्रेसची वाटचाल सुकर
अमरावती : अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बी.टी. देशमुखांचा आम्हाला आशीर्वाद आहे, असा ठाम विश्वास काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संजय खोडके यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेतून व्यक्त केला.
काँग्रेसच्यावतीने पदवीधर मतदार संघातून १७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमिवर खोडके यांनी पत्रपरिषदेतून भूमिका माडली. संजय खोडके यांनी समविचारी पक्ष, संघटनांच्या पाठिंब्यावर पदवीधर निवडणूक काबीज करणार असल्याचा दावा केला. राज्यातील भाजपचे सरकार हे शिक्षक-पदवीधरांच्या अहिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळेच औरंगाबाद येथे न्याय मागण्यास गेलेल्या शिक्षकांवर लाठीहल्ला करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक काँग्रेस पहिल्यांदाच लढवीत आहे. अमरावती, अकोला जिल्ह्यात नोंदणी झालेल्या पदवीधर मतदारांच्या आकडेवारीनुसार ही निवडणूक कठीण नाही, असे खोडके म्हणाले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी नामांकन अर्ज सादर करताना उपस्थित राहतील. त्यानुसार नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. थेट अनुशेषाच्या मुद्यावर बोट ठेवताना संजय खोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता अनुशेषाचा प्रश्न विसरले आहेत. बी.टी. देशमुखांनी विधानपरिषदेत सर्वच बाबींचा अनुशेष दूर करण्यासाठी लढाई लढली. मात्र, त्यानंतर पदवीधर मतदारसंघाचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्यांनी अनुशेषाचा मुद्दा गुंडाळून ठेवल्याचा आरोप संजय खोडके यांनी केला. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात पदवीधर बेरोजगांचे प्रश्न, अनुशेष, शिक्षकांचे प्रश्न व समस्या आदींचा समावेश राहील, असे ते म्हणाले. बी. टी. देशमुखांनी ‘पदवीधर’च्या निवडणुकीसाठी आम्हाला आशीर्वाद दिला असून अधिकृत पाठिंब्यासाठी त्यांना पत्र दिले आहे. 'नुटा' ही पदवीधरांची संघटना कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. मात्र, बीटींचा आम्हाला आशीर्वाद आहे, असा दावा खोडके यांनी केला आहे. पत्रपरिषदेला महापौर चरणजित कौर नंदा, संगीता शिंदे, माजी आमदार सुलभा खोडके, भोजराज काळे, गाजी जहरोश, दिलीप कडू, नितीन चव्हाळे, ललित चौधरी, दादाराव टवलारे, विकास दवे, शरद तिरमारे, संजय आसोले, बुरघाटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)