देवी रुक्मिणीची पालखी यंदाही जाणार पंढरपूरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 02:22 PM2020-06-24T14:22:28+5:302020-06-24T14:22:53+5:30
सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन वारीवर काहीशी मर्यादा आली; मात्र महत्त्वाच्या पालख्या योग्य ती दक्षता घेऊन आणण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यात कौंडण्यपूरच्या पालखीचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देवी रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौंडण्यपूर येथील पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार आहे. सव्वाचारशे वर्षांच्या पालखी परंपरेत कोरोनाच्या संकटकाळातही खंड पडणार नाही. आवश्यक ती दक्षता घेऊन पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. यासंदर्भात पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी कौंडण्यपूर स्थित श्री विठ्ठल-रुखमाई संस्थानला पत्राद्वारे कळविले आहे.
आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त १ जुलै रोजी आषाढी वारी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणार आहे. येथे प्रमुख संतांच्या पादुकांचा श्री पांडुरंगास भेटीचा सोहळा असतो. त्यानिमित्त राज्यभरातून पालख्या पंढरपूरला येत असतात. सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन वारीवर काहीशी मर्यादा आली; मात्र महत्त्वाच्या पालख्या योग्य ती दक्षता घेऊन आणण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये राज्यातील नऊ पालख्या आहेत. त्यात कौंडण्यपूरच्या पालखीचा समावेश आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी तसे पत्र श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुखमाई संस्थानच्या विश्वस्तांना पाठवले आहे.
आषाढी यात्रेचा कालावधी आषाढ शुक्ल प्रथम (२२ जून) ते आषाढ शुक्ल १५ (५ जुलै) असा राहणार आहे. माता रुक्मिणीची पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांची नावे मंदिर समितीस कळविण्याबाबत पत्र संस्थानला देण्यात आले आहे. त्यानुसार समितीतर्फे येणाऱ्या भाविकांना प्रवेशपत्रिका दिल्या जाणार आहेत.
पालकमंत्र्यांचा पाठपुरावा
कौंडण्यपूर येथील ४२५ वर्षांची प्राचीन परंपरा अखंडित राहावी, यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने पालखीला मान्यता दिली. देवी रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला जाणार असल्याने विदर्भातील वारकरी, भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे.