पित्याच्या मृत्यूचे दु:ख पचवून मिळविले सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:19 PM2017-08-20T23:19:02+5:302017-08-20T23:19:27+5:30
अभियंता होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी जिद्दीने अभ्यासही सरू होता. मात्र, अभियांत्रिकीची परीक्षा सुरू असतानाच तिच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले.
अमरावती : अभियंता होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी जिद्दीने अभ्यासही सरू होता. मात्र, अभियांत्रिकीची परीक्षा सुरू असतानाच तिच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, अश्रू डोळ्यांमध्ये साठवून तिने अभ्यास पूर्ण केला आणि उपकरणीकरण अभियांत्रिकी शाखेतून सुवर्णपदक पटकावले. तिच्या वाढदिवशीच रविवारी तिला हे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यावेळी वडिलांच्या आठवणींनी तिच्या डोळ्यांना अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.
ही संघर्षगाथा आहे वैशाली खापरे हिची. रविवारी स्थानिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वाटप समारंभानंतर तिने ‘लोकमत’शी संवाद साधला. ती म्हणाली अभियांत्रिकी पदवी घेण्याचे आधीपासूनचे स्वप्न होते. त्यासाठी पुरेसे परिश्रमदेखील सुरू होते. मात्र, ऐन परीक्षेच्या वेळीच तिचे वडील जगदीश खापरे यांचे आकस्मिक निधन झाले. हे कुटुंब मूळ नाशिक जिल्ह्यातील. वैशाली मुंबई (कल्याण) येथे राहते. तिची आई आई मेस चालविते. अत्यंत साधरण कुटुंबातील असल्याने वैशालीला अभियंता होऊन चांगला उद्योग करायचा आहे. त्यासाठी तिने खूप अभ्यास केला. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान तिच्या चेहºयावर झळकत होते. सध्या वैशाली ही मुंबई येथील एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे.एक भाऊ आणि एक बहिण व आई असे वैशालीचे कुटूंब आहे. तिला उद्योगक्षेत्रात मोठे नाव कमवायचे असल्याचे ती म्हणाली.