सोने ६४ हजारांच्या घरात जाणार; सध्या सराफा बाजारात शुकशुकाट

By प्रदीप भाकरे | Published: January 21, 2024 03:08 PM2024-01-21T15:08:27+5:302024-01-21T15:14:33+5:30

ध्या २४ कॅरेटच्या एक तोळ्यासाठी मोजा ६२,५०० रुपये : सराफा बाजारात शुकशुकाट

Gold will go into the house of 64 thousand; At present, the bullion market is bullish | सोने ६४ हजारांच्या घरात जाणार; सध्या सराफा बाजारात शुकशुकाट

सोने ६४ हजारांच्या घरात जाणार; सध्या सराफा बाजारात शुकशुकाट

अमरावती : नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. अमरावतीच्या सराफा बाजारात २० जानेवारी रोजी २४ कॅरेट सोने दर प्रतितोळा ६२ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. चांदी प्रतिकिलो उच्चांकी ७५ हजारांवर गेली आहे. पुढील आठवड्यात २४ कॅरेट सोने ६३ ते ६४ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२३ मध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ५४,५०० ते ५६ हजार, तर जानेवारी २०२४ मध्ये तो दर सरासरी ६२ हजार ते ६२ हजार ७०० रुपयांवर पोहोचला आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सोने व चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोने दोन-अडीच वर्षांतील उच्चांकी दरावर आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ६३ हजार ६८८ रुपयांवर गेला होता. यानंतर १५ जानेवारीला सोन्याचे दर प्रतितोळा ६२,७०० रुपये होता, तर १७ जानेवारीला सोने ६२ हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले. सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे सोने ६५ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाढलेले सोन्याचे दर तसेच पौष महिन्यात फारसे मुहूर्त नसल्यामुळे विवाह सोहळेसुद्धा अतिशय मोजकेच होत आहेत. त्यामुळे सोने विक्री थंडावली असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले आहे. मौंज, साखरपुडा, जन्माचा, लग्नाचा वाढदिवस आदी दिवसाला सोने खरेदी केली जाते. मात्र, सध्या भाववाढ झाल्यामुळे सोने खरेदीचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे.

असे आहेत सोन्या-चांदीचे दर
दिनांक : २४ कॅरेट : २२ कॅरेट : २० कॅरेट : चांदी

१५ जानेवारी : ६२७०० : ६०८०० : ५९६०० : ७५०

१६ जानेवारी : ६२७०० :६०८०० : ५९६०० : ७५०
१७ जानेवारी : ६२२०० : ६०३०० : ५९१०० : ७४०

१८ जानेवारी : ६२००० : ६०१०० : ५८९०० : ७४०
१९ जानेवारी : ६२३०० : ६०४०० : ५९२०० : ७५०

२० जानेवारी : ६२५०० : ६०६०० : ५९४०० : ७५०


जागतिक प्रतिकूल परिस्थिती पाहता सोन्याच्या भावात २०२४ मध्ये तेजीचे संकेत आहेत. ते ६५ हजारांच्या घरात जाण्याचे संकेत आहेत. शनिवारी २४ तोळ्यांच्या सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम ६२ हजार ५०० असा होता.
- श्रीकांत मारोडकर, सुवर्ण व्यावसायिक

असे होते सन २०२३ च्या सुरुवातीचे दर

३१ डिसेंबर २०२२ रोजी १५० रुपयांची वाढ होऊन सोनेदर प्रतितोळा ५५ हजार ४०० रुपयांवर गेले होते. यानंतर १ आणि २ जानेवारी २०२३ रोजी दर ५४,५०० व ५४,९०० रुपयांपर्यंत खाली आले. ४ जानेवारीला सोन्याचे दर प्रतितोळा ५५,४०० रुपये होते, तर ७ जानेवारीला सोने ५५ हजार ८०० रुपयांवर गेले. ९ जानेवारी रोजी तोळाभर २४ कॅरेट सोन्यासाठी ५६ हजार रुपये मोजावे लागले होते.

Web Title: Gold will go into the house of 64 thousand; At present, the bullion market is bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.