गोल्डन गँगचे कमबॅक, टक्केवारीची बजबजपुरी

By admin | Published: August 13, 2016 12:03 AM2016-08-13T00:03:08+5:302016-08-13T00:03:08+5:30

१३ महिन्यांच्या कालावधीनंतर गोल्डन गँगने जोरदार कमबॅक केले आहे.

Golden Gang's Comeback, Percentage Percentage | गोल्डन गँगचे कमबॅक, टक्केवारीची बजबजपुरी

गोल्डन गँगचे कमबॅक, टक्केवारीची बजबजपुरी

Next

महापालिकेतील वास्तव : निवडकांचा दबदबा, आयुक्तांना सल्ले
अमरावती : १३ महिन्यांच्या कालावधीनंतर गोल्डन गँगने जोरदार कमबॅक केले आहे. यंत्रणेच्या निर्णय प्रक्रियेत गोल्डन गँगच्या सदस्यांनी आपली मोहोर उमटविण्यासाठी धडपड चालविली आहे. या पुनर्प्रवेशामुळे टक्केवारीच्या बजबजपुरीत घसघशीत वाढ झाली आहे.
तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कार्यकाळात गोल्डन गँग अशी नवी बिरुदावली काहींच्या नावामागे लागली. या गोल्डन गँगमध्ये त्यावेळी ७ ते ८ जणांचा समावेश होता. या गोल्डन गँगने सांगायचे आणि यंत्रणेने त्यावर डोळे झाकून शिक्कामोर्तब करायचे, असा त्यावेळचा शिरस्ता होता. ही गोल्डन गँग महापालिका चालवीत असल्याचा आरोप त्यावेळी सातत्याने झाला. या कालावधीत शहराचा विकास खुंटला. मात्र विशिष्ट लोकांचे आर्थिक हितसंबंध जोपासले गेले. माजी मंत्री सुनील देशमुख यांनीच या मोजक्यांना गोल्डन गँग असे नामानिधान दिले होते. सुरक्षा रक्षकांचा कंत्राट असो वा साफसफाईचा. अत्र-तत्र, सर्वत्र या गोल्डन गँगचा दबदबा होता. तत्कालीन यंत्रणेचेही त्याला पाठबळ असल्याने या गोल्डन गँगचे फावत राहिले. या महापालिकेचेच नव्हे, तर अंबानगरीचे आम्हीच जाणकार आहोत, अशी आवई त्यावेळी उठविण्यात आली. त्यांची ही कृती यंत्रणेतील भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी ठरली.डोंगरे यांच्या कार्यकाळात गोल्डन गँगने महापालिकेवर अक्षरश: वर्चस्व गाजवले. गोल्डन गँगचा वारू चौखूर उधळत असताना १४ एप्रिलला चंद्रकांत गुडेवार यांनी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. आल्या आल्या गुडेवारांवरही जाळे फेकण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते त्यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे इतरांप्रमाणे गोल्डन गँगही बॅकफूटवर आली. गुडेवारांच्या बदली आदेशाने हा स्लॅक सिझन संपुष्टात आला. आयुक्तपदी हेमंत पवार रुजू झाले आणि लागलीच गुडेवारांच्या बदलीचा विरोध करणारे, रस्त्यावर उतरणारे पवारांच्या तंबूत डेरेदाखल झाले. पुन्हा सल्ल्यांचा रतीब घालण्यास सुरुवात झाली. आपल्याला प्रत्येक समस्यांची जाण, त्या समस्यांचे सोल्युशन आहे, असे किस्से ऐकविण्यास सुरुवात झाली आहे.स्वत:च्या राजकारणाला पोषक ठरेल आणि आपलेच महत्त्व वाढेल, अशी व्यूहरचना भक्कमपणे रचण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य अधिकारीपदावर प्रभारी व्यक्ती कसे सक्षम आहेत हे पटवून सांगण्याचा प्रयत्न असो वा एखाद्या निलंबित कर्मचाऱ्याची पुन:स्थापना असो प्रत्येक बाबींमध्ये नाक खुपसण्याचे जोरकस प्रयत्न नव्याने सुरू झाले आहेत.

गोल्डन गँगचा विरोधही वाढला
गोल्डन गँगचा वाढता प्रभाव महापालिका वर्तुळासाठी कमालीचा त्रासदायक ठरू लागला आहे. मागे एका बैठकीत तर विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याला डावलले जात असल्याची बाब स्पष्टपणे आयुक्तांसमोर बोलून दाखविली होती. आम्हालाही कळते, आपल्यालाही समस्यांची, त्यावरील उपायांची जाण असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितल्यावर आयुक्तांनी सर्वांनाच बैठकीला बोलावण्याच्या सूचना अधिनिस्थांना दिल्या होत्या. मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याने संतापात भर पडली आहे. यंत्रणेकडून आपल्याला डावलले जात असल्याची भावना तीव्र होत चालली आहे.

Web Title: Golden Gang's Comeback, Percentage Percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.