शहरातील ८० अनधिकृत धार्मिक स्थळांवर गंडांतर
By admin | Published: April 2, 2016 12:03 AM2016-04-02T00:03:03+5:302016-04-02T00:03:03+5:30
शहरातील ८० अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी महापालिकेने घोषित केली आहे.
आक्षेप मागवले : लवकरच निष्कासन
अमरावती : शहरातील ८० अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी महापालिकेने घोषित केली आहे. या स्थळांवर लवकरच निष्कासनाची कारवाई केली जाणार असल्याने यंत्रणेने आक्षेप किंवा हरकती मागविल्या आहेत.
शासन निर्णय क्र. सीटीएम-९०९/प्र.क ५५८ भाग २/विशा-ब दि. ५ मे २०१५ मधील निर्देशांनुसार २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या निष्कासित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्थळांची यादी महापालिका झोन कार्यालयामार्फत तयार करण्यात आली आहे. या यादीत नमूद धार्मिक स्थळांचे निष्कासन महापालिकेकडून करण्यात येणार असल्याने या कारवाई संदर्भात संबंधित झोन कार्यालयात आक्षेप वा हरकती नोंदवायच्या आहेत. २९ एप्रिलपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. संबंधित झोन कार्यालय प्राप्त हरकतींच्या अनुषंगाने महापालिकास्तरिय समितीकडे अहवाल सादर करणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर संपूर्ण राज्यातच अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर वरवंटा फिरविला जाण्याची शक्यता अधिक आहे. उत्तर झोन क्रमांक १ रामपुरी कॅम्पमधील २४, मध्य झोन क्रमांक २ मधील ८, पूर्व झोन क्र. ३ मधील ११, दक्षिण झोन बडनेरामधील ३६ आणि पश्चिम झोन क्र. ५ भाजीबाजारमधील १ अशा एकूण ८० धार्मिक स्थळांचा यात समावेश आहे.