नांदगाव नगरपंचायतीत तीन लाखांच्या बिलाचे गौडबंगाल

By admin | Published: May 3, 2016 12:27 AM2016-05-03T00:27:59+5:302016-05-03T00:27:59+5:30

नव्याने स्थापन झालेल्या नांदगाव नगरपंचायतला अवघ्या सहा महिन्यांतच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून ...

Gondbangal of three lakh bills in Nandgaon Nagar Panchayat | नांदगाव नगरपंचायतीत तीन लाखांच्या बिलाचे गौडबंगाल

नांदगाव नगरपंचायतीत तीन लाखांच्या बिलाचे गौडबंगाल

Next

प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे : नियमाला तिलांजली
मनोज मानतकर  नांदगाव खंडेश्वर
नव्याने स्थापन झालेल्या नांदगाव नगरपंचायतला अवघ्या सहा महिन्यांतच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून ३ लाख १० हजारांच्या बोगस बिलांचा प्रश्न विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सादर करून दोषींवर योग्य कारवाईची मागणी केली आहे व शासकीय नियमाला बगल देणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवरसुद्धा तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक सतीश पटेल व संजय पोपळे यांनी केली आहे.
२२ एप्रिल रोजी ३ लाख १० हजार रुपयांचे जे बिल लेखापालांकडून मंजूर करण्यात आले, त्यामध्ये अनेक बनावट बिल सादर करून पैसेसुद्धा काढण्यात आले आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना माहिती देवूनसुद्धा मुख्याधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. फार मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे जनतेने सत्तेची धुरा सोपविली तेच सत्ताधारी जनहीत नव्हे, तर स्वहीत साधत जनतेचा अपेक्षाभंग करीत असल्याचा आरोप होत आहे. अनेक समस्यांचा डोंगर नांदगाव वासियांसमोर उभा असताना सत्ताधारी नगरसेवक स्वहीत साधण्यात मशगुल असल्याने नांदगाव वासियांना नागरी सुविधा देण्यात नगरपंचायत अपयशी ठरली आहे. तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पी. पी. सूर्यवंशी मनमानी कारभार करीत असून विरोधी बाकावरील नगरसेवकांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. तसेच सर्वसाधारण सभेच्या विषयसूचीवर व सभेसमोर स्थायी समितीच्या कार्यवृत्ताचे वाचन करण्यात येत नसून कार्यवृत्त कायम न करता कधी स्वत:च्या अधिकारात मुख्याधिकारीही करीत असल्याचे नगरसेवक सांगतात व नगरपंचायतची सर्वसाधारण सभा दोन महिन्यांपासून एकदा घेणे बंधनकारक असतानासुद्धा दोन महिन्यांचा कालावधी होऊनही अद्याप नोटीस काढण्यात आलेली नाही. मागील सर्वसाधारण सभेबाबतची माहिती मागितली असता अद्याप मागील सभेचे प्रोसिडींग लिहिण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले असल्याने मुख्याधिकारी कर्तव्यात कसूर करीत असल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे शहर विकासाला आळा बसला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशावर मौजमजा करून विकास निधीत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी नगरसेवकांकडून होत आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नगरपंचायतमधील भ्रष्टाचाराचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने टोलवल्याने आता जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे नांदगाव वासियांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Gondbangal of three lakh bills in Nandgaon Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.