आनंदात निघाले मेळघाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:19 AM2018-01-23T00:19:28+5:302018-01-23T00:19:55+5:30
मेळघाटच्या नावाने घाबरणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी ‘मिशन मेळघाट’वर जाण्यापूर्वीच परतवाड्यात गरम चहाचा आनंद घेत होते.
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : मेळघाटच्या नावाने घाबरणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी ‘मिशन मेळघाट’वर जाण्यापूर्वीच परतवाड्यात गरम चहाचा आनंद घेत होते. घाटवळणाच्या नागमोडी रस्त्यावरून उंच पहाडामध्ये असलेल्या आदिवासी खेड्यांत एकाच ध्येयपूर्तीसाठी जिल्हा परिषदेचे हजारांवर कर्मचारी आनंदात रवाना झाले.
धारणी किंवा चिखलदरा तालुक्यात बदली झाली की, अनेकांना नको तो आजार जडतो. नातेसंबंध आठवायला लागतात. काहींचे नातलग आजारी होतात, यावरही कळस म्हणजे, राजकारण्यांच्याही चरणी जाणाºयांची संख्याही कमी नाही. परतवाडा विश्रामगृहासमोर सोमवारी चित्र मात्र पूर्णत: विपरीत दिसून आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, कृषी, बालविकास, बांधकाम, पाटबंधारे, पशुसंवर्धन, स्वच्छता मिशन एक नव्हे सर्वच विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रसन्न मनाने मेळघाटात जाताना दिसले.
सीईओंच्या गोपनीय भेटी..: तीन दिवस मेळघाटात अख्खे प्रशासन घेऊन जाणारे जिल्हा परिषदेचे सीईओ किरण कुलकर्णी आपल्यासह काही महत्त्वपूर्ण अधिकाºयांच्या दौºयाबाबत गोपनियता ठेवली. उद्दीष्ठपूर्ती असलेल्या ९९ गावांमध्ये केव्हाही भेटी देऊन तपासणी व आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करीत अडचणीवर मात करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
औषध, बिस्तरे सोबत...: सोमवारपासून तीन दिवस मुक्कामी गेलेल्या दीड हजारांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार औषधे, कपडे, गरम कपडे आदी साहित्य सोबत नेले. काहींनी मेळघाटच्या गावामध्ये अनेक वर्षे काढलेली होती, तर काहींना मेळघाट नवीन होता. चांगल्या कामासाठी प्रसन्न मनाने जात असल्याचे अनेक अधिकाऱ्यांनी सांगितले. नावे वेगवेगळी असली तरी उद्दिष्ट मात्र एकच होते.
‘लोकमत'मुळे मिळाली ऊर्जा
सोमवारी सकाळी ७ वाजतापासून वाहनांचा ताफा साहित्य घेऊन आपल्या कर्तव्यावर निघत होता. ‘लोकमत’च्या वृत्तांनी आम्हाला वेगळी उर्जा मिळाल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाºयांनी आवर्जून उल्लेख केला.