‘अच्छे दिन’ची हवा गूल
By Admin | Published: August 25, 2016 12:02 AM2016-08-25T00:02:11+5:302016-08-25T00:02:11+5:30
‘अच्छे दिन’ येणार अशी स्वप्ने दाखवित केंद्र व राज्यात सत्ता मिळविणाऱ्या भाजपचे आता ‘बुरे दिन’ सुरु झाले आहेत.
निवडणुकीसाठी सज्ज व्हा : अशोक चव्हाण यांचा काँग्रेसजनांना सल्ला
अमरावती: ‘अच्छे दिन’ येणार अशी स्वप्ने दाखवित केंद्र व राज्यात सत्ता मिळविणाऱ्या भाजपचे आता ‘बुरे दिन’ सुरु झाले आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी केले.
नागपूर महामार्गालगतच्या एका हॉटेलमध्ये जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने आयोजित निवडणूकपूर्व तयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी खासदार सुबोध मोहिते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ.यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, बंडू सावरबांधे, रामकिसन ओझा, शेखर शेंडे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, रावसाहेब शेखावत, पुष्पाताई बोंडे, सुलभा खोडके, प्रकाश साबळे, किशोर बोरकर, संजय अकर्ते, बबलू शेखावत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. अशोक चव्हाण म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आतापासूनच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि या संस्थांवर पक्षाचा झेंडा फडकवावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
सध्या भाजप शासनविरोधी वातावरण आहे. जुन्याच योजनांची नावे बदलवून विद्यमान सरकार काँग्रेसच्या योजना राबवित असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने हा मुद्दा तळगाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असा सल्ला खा. अशोक चव्हाण यांनी दिला. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाभरातील तालुका, शहराध्यक्ष व नगरपरिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी बहुतांश पदाधिकारी व सदस्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात पक्षाचे काम चांगले सुरू असून आगामी निवडणुकीत घवघवीत यश संपादन होईल, असा विश्वास व्यक्त केला.
तत्पूर्वी दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुकाध्यक्षांकडून काँँग्रेस पक्ष संघटन व स्थानिक स्वराज्य संस्थाचे पक्ष पदाधिकारी व त्यांची कामगिरी सुद्धा जाणून घेतली. १४ तालुक्यांतील सर्व पदाधिकाऱ्यांना मंचासमोर पाचारण करून त्यांच्याकडून निवडणूकपूर्व तयारीचा आढावा काँग्रेस नेत्यांनी घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी अमरावती जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाल्लेकिला असून आगामी निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले जाईल.
काँग्रेस पक्षाचा कुणीही पराभव करू शकत नाही. फक्त गटबाजीमुळेच पराभव होतो. त्यामुळे मतभेद बाजूला सारून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी वातावरणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. यावेळी आ.वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. भाजपच्या दुटप्पी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी हजर होते. इतरही अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी चर्चा झाली. (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती
आगामी निवडणुकपूर्व तयारीच्या आढावा बैठकीसाठी बुधवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस पक्षाच्या १४ तालुक्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी लक्षणीय गर्दी केली होती. विशेषत: महिला पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावून काँग्रेसमध्ये ‘महिला राज’ येण्याचे संकेत दिले. बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जय्यत तयारी करण्यात आली होती, हे विशेष.