Good News : पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 06:27 PM2020-02-09T18:27:51+5:302020-02-09T18:29:34+5:30

सतत दुष्काळ, कमी पाऊस या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत व-हाडात पहिल्यांदा सकारात्मक चित्र समोर आले आहे.

Good News: Increase in ground water level in 49 talukas of West Vidarbha | Good News : पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ

Good News : पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ

Next

- गजानन मोहोड

अमरावती : सरासरीपेक्षा अधिक पाऊस, त्यामुळे सिंचनासाठी कमी झालेला उपसा व सप्टेंबरनंतरही झालेल्या पावसाने जलपुनर्भरण यामुळे पश्चिम विदर्भात ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ झालेली आहे. त्यातुलनेत फक्त सात तालुक्यांत कमी आलेली आहे. सतत दुष्काळ, कमी पाऊस या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत व-हाडात पहिल्यांदा सकारात्मक चित्र समोर आले आहे. जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या हजार कामांचेही सुखद चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

भूजल सर्वेक्षण विभाग (जीएसडीए) द्वारा अमरावती विभागात झालेले पर्जन्यमान व ६३१ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीशी पाच वर्षांच्या सरासरीची तुलना केल्यानंतर हे निरीक्षण नोंदविले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १४६ विहिरींमध्ये १.५३ मीटरने वाढ झालेली आहे. अकोला जिल्ह्यात ६५ निरीक्षण विहिरींमध्ये ०.२१, वाशीम जिल्ह्यात ७९ विहिरींमध्ये ०.१७, बुलडाणा जिल्ह्यात १६५ विहिरींमध्ये २.३२, तर यवतमाळ जिल्ह्यात १७६ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीत ०.६८ ने वाढ झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे. 

अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी, अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा व यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, दारव्हा, दिग्रस तालुक्यातील भूजलस्तरात कमी आलेली आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात सर्वाधिक ३.६० मीटर, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व अमरावती जिल्ह्यात मोर्शी व वरूड तालुक्यात २ मीटरपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. भूजलात तूट आलेल्या तालुक्यात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अन्वये भूूजल उपशावर नियंत्रण आवश्यक असल्याची शिफारस शासनाला करण्यात आलेली आहे.

आठ टक्के भूभागातच भूजलाची उपलब्धी
राज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टक्के भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीण अशा अग्निजन्य खडकाने व्यापला आहे ज्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता अत्यंत कमी म्हणजे १ ते ३ टक्केच आहे. १० टक्के भूभाग कठीण रुपांतरित खडकांनी व्यापला आहे. त्यामध्येही भूजलाची उपलब्धता कमी आहे. उर्वरित ८ टक्के भूभाग हा खडकांनी व गाळाने व्यापला असल्याने त्यात भूजलाची उपलब्धता चांगल्याप्रकारे होत असल्याचे जीएसडीएने सांगितले.

यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने उपसा कमी झाला व सप्टेंबरनंतरही पाऊस झाला. त्यामुळे जलपुनर्भरण झालेले आहे. याशिवाय विभागात झालेल्या जलयुक्त शिवारमधील कामांचादेखील हा सकारात्मक परिणाम आहे.
- उल्हास बंड,
 भूवैज्ञानिक, जीएसडीए

Web Title: Good News: Increase in ground water level in 49 talukas of West Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.