ग्रामीण भागात सेवा दिल्यास उत्तम पॅकेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:08 PM2018-01-20T23:08:55+5:302018-01-20T23:09:19+5:30
ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना तसेच विशेषज्ञांना उत्तम वेतन व चांगले भत्ते देण्याचा प्रस्ताव आहे.
आॅनलाईन लोकमत
चांदूर रेल्वे : ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना तसेच विशेषज्ञांना उत्तम वेतन व चांगले भत्ते देण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच हा निर्णय अंमलात येईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण समारंभात सांगितले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आ. वीरेंद्र जगताप, जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, आरोग्य सभापती बळवंतराव वानखेडे, पं.स. सभापती छबुताई जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सावंत म्हणाले की, डॉक्टर ग्रामीण भागात सेवेसाठी बाहेरून येत असतो. त्यामुळे आरोग्य केंद्रातील निवासस्थानांचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नांदगाव खंडेश्वर येथील ट्रामा केअर युनिटसाठी आवश्यक विशेषज्ञ नियुक्त करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात प्रवीण घुईखेडकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चव्हाटे यांनी आभार मानले.
चांदूरात उपजिल्हा रुग्णालय व्हावे...: चांदूर उपविभाग असल्याने चांदूर रेल्वे येथे उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य यंत्रणेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीसाठी कृती आराखडा मंजूर करून मिळावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली.