गोपालनगरात ८५४ किलो किराणा पकडला
By admin | Published: October 11, 2014 01:02 AM2014-10-11T01:02:53+5:302014-10-11T01:02:53+5:30
गोपालनगरस्थित मराठा कॉलनी परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने दोन घरांवर छापे मारुन ८५४ किलो किराणा जप्त केला.
अमरावती : गोपालनगरस्थित मराठा कॉलनी परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने दोन घरांवर छापे मारुन ८५४ किलो किराणा जप्त केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा किराणा वितरित करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरुन, पोलीस उपनिरीक्षक नितीन थोरात यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप वाघमारे, चैतन्य रोकडे, दीपक श्रीवास, संजय बाळापुरे, प्रणय वाघमारे, संदीप देशमुख, नीलेश गुल्हाने यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता गोपालनगर परिसरातील मराठा कॉलनी येथील रहिवासी रेखा मानकर आणि सुमन ढोके यांच्या घरावर छापा मारला. यावेळी रेखा मानकर यांच्या घरी ९७ पोते आणि सुमन ढोके यांच्याकडे २५ पोते किराणा आढळून आला. प्रत्येक पोत्यामध्ये ७ किलोचा किराणा सामान पॅकींग असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी १२२ पोत्यांमधील ८५४ किलोचा किराणा जप्त केला. हा किराणा सुमारे ४४ हजार ७७४ रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई करताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला बोलविण्यात आले होते. यामध्ये कार्यकारी दंडाधिकारी कोल्हे, खटके, सहायक निरीक्षक उज्ज्वल इंगोले, उपनिरीक्षक राजेश त्रिवेदी, बढे, राजापेठचे ठाणेदार एस. एस. भगत यांचा समावेश होता.