रिझल्ट लागला! १६,९२७ आजी, ८३८९ आजोबा परीक्षेत पास
By जितेंद्र दखने | Published: May 6, 2024 08:55 PM2024-05-06T20:55:10+5:302024-05-06T20:55:20+5:30
नवभारत साक्षरता अभियान : २६६ जण झाले नापास
अमरावती: नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या पहिल्या परीक्षेत २५ हजार ५८२ पैकी २५ हजार ३१६ आजी, आजोबा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६ हजार ९२७ आजी अन् ८ हजार ३८९ आजोबांचा समावेश आहे. तर २६६ जण या परीक्षेत नापास झाले आहे. नातवंडांसोबत शिक्षणाचे धडे गिरविलेले आजी, आजोबा उत्तीर्ण झाल्याने त्यांना आता लवकरच त्यांना साक्षर झाल्याचे गुणपत्रकही दिले जाणार आहे. केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागांतून निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. २०२७ पर्यत १०० टक्के नागरिकांना साक्षर करण्याचे ध्येय ठेवले आहे.
जिल्ह्यात २०२२-२३ व २०२३-२४ साठी २५ हजार ५८२ निरक्षर नोंदणीचे उद्दिष्ट दिलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील साक्षरता कार्यक्रमासंबंधी टास्कनुसार हे सर्वेक्षण होते. जिल्ह्यात २०२२-२३ व २०२४ साठी उल्हास ॲपद्वारे २५ हजार ५८२ निरक्षरांची नोंदणी केलेली; तसेच त्यांना शिकविण्यासाठी २२४६ स्वयंसेवकांची नोंदणी झाली होती. या सर्वेक्षणानंतर सर्व तालुक्यांत साक्षरतेचे वर्ग सुरू केले होते. या वर्गात शिकलेल्यांची १७ मार्च रोजी जिल्ह्यातील १६०३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात २५ हजार ३१६ आजी-आजोबा उत्तीर्ण झाले आहेत. तर २६६ जण नापास झाले आहे.
मोबाइलमुळे प्रक्रिया सुलभ
नवभारत साक्षरतेसाठी वर्ग सुरू झाल्यानंतर संबंधितांना साक्षरतेचे व्हिडीओ दाखविण्यात आले. त्यांच्या मोबाइलवर ते पाठविण्यात येत होते. मोबाइल क्रांतीमुळे नवभारत साक्षरतेची प्रक्रिया सुलभ झाली.-प्रीतम गणगणे,सहायक योजना अधिकारी
सप्टेंबरमध्ये होणार
वाचन, लेखन व संख्याज्ञानावर प्रत्येकी ५० गुणांची ही परीक्षा होती. उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४९.५ गुण आवश्यक होते. आता पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापनाची दुसरी चाचणी सप्टेंबरमध्ये होणार आहे. नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत २६६ जण नापास झाले आहेत. यामध्ये १७५ महिला आणि ९१ पुरुषांचा समावेश आहे. या नापास झालेल्या निरक्षरांची लवकरच फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
काय आहे नवभारत साक्षरता अभियान?
प्राथमिक शिक्षण, डिजिटल आणि आर्थिक साक्षरता, तसेच १५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना ज्यांनी शाळेत जाण्याची संधी गमावली आहे, त्यांना जीवनाची गंभीर कौशल्ये शिकविण्यासाठी २०२२ ते २०२७ या पाच वर्षांत साक्षर करण्यासाठी ‘नवभारत साक्षरता अभियान’ सुरू केले आहे.