शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
By admin | Published: March 9, 2016 12:58 AM2016-03-09T00:58:42+5:302016-03-09T00:58:42+5:30
वरुड व मोर्शी तालुक्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेत. शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
पालकमंत्री : वरुड, मोर्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
मोर्शी : वरुड व मोर्शी तालुक्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेत. शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करताना झालेले नुकसान पाहून आपल्या सर्वेक्षणात लवचिकता ठेवावी. सर्वेक्षण करून मुख्यमंत्री, कृषी व महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करू व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केली.
अमरावती जिल्ह्यात ६ मार्च रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मृग बहराच्या तसेच आंबिया बहराच्या संत्र्याचे मोर्शी व वरुड तालुक्यात नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पाहणी केली. यावेळी आ.अनिल बोंडे, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, वरुडचे तहसीलदार भुसारी, कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील पुरोहित, लाखारा येथील रामदास खंडार, वरुड तालुक्यातील बारगाव येथील गोपाल मानकर, बनोडा शहीद येथील पटोळे व काशीराव तिजोरे या शेतकऱ्यांच्या बागातील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच रोशनखेडा येथील ६ मार्च रोजी झालेल्या वादळी पावसामुळे बाधित झालेल्या नीलेश बारस्कर यांच्या घराचीसुद्धा पाहणी त्यांनी यावेळी केली. मृग बहराच्या संत्र्याला भाव होता. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करावे. सर्वेक्षण करताना शेतकरी हा पहिलेच नुकसानीमुळे खचला आहे त्याच्या विषयी सहानुभाव ठेवून सर्वेक्षण करावे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच या सर्वेक्षणाचा लाभ नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळावा व कोणी सुटणार नाही याची दक्षता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी व प्रशासनाला तशी माहिती पुरवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली व सांगितले की, या संकटात शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. त्यांनी खचून न जाता झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.
यावेळी झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन केले. (प्रतिनिधी)