शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार नापास
By admin | Published: March 8, 2016 12:08 AM2016-03-08T00:08:24+5:302016-03-08T00:08:24+5:30
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यानंतरही शासन मात्र कोणताही ठोस निर्णय घेत नाही.
यशोमती ठाकूर यांचा आरोप : विकासकामांना प्रारंभ
तिवसा : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यानंतरही शासन मात्र कोणताही ठोस निर्णय घेत नाही. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. पण आम्ही मात्र शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसोबत आहोत, असे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. खोलापूर, भातकुली येथील विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी मुकद्दर खाँ पठाण होते. व्यासपीठावर सरिता मकेश्वर, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, इंदुताई कडू, आशुतोष देशमुख, गिरीश देशमुख, विजय मकेश्वर, नईम, वाहीदभाई, काजीमभाई, गफ्फार शहा, नरेंद्र मकेश्वर, मुरादभाई उपस्थित होते. यावेळी खारतळेगाव, खोलापूर, वाठोडा शुक्लेश्वर येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. आ. यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, विकासासाठी समन्वय आणि एकवाक्यता असायला हवी. ग्रामीण भागात अनेक समस्या, प्रश्न ऐरणीवर आले आहे. मात्र सद्याचे सरकार याबाबत पूर्णपणे उदासीन असल्यामुळे हे सरकार नेमके करते काय, असा प्रश्न उपस्थितीत होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या सोबत होतो आणि आतासुद्धा आहे. विकास कामात राजकारण करणे ही आमची परंपरा नाही त्यांना जे करायचे ते करू द्या. आपण मात्र एकजुटीने राहून त्यांना प्रत्युत्तर दिले पाहिजे. तेव्हाच आपली ताकद आणि क्षमता सिद्ध होईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)