वरुडात शासनाची तिरडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:10 PM2017-11-22T23:10:33+5:302017-11-22T23:11:13+5:30
सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजुरांना प्रलोभने दाखविली. सत्तेत आल्यावर नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीचा केवळ देखावा करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्यासह केंद्रातील सरकार करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजुरांना प्रलोभने दाखविली. सत्तेत आल्यावर नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीचा केवळ देखावा करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्यासह केंद्रातील सरकार करीत आहे. यासोबतच अकार्यक्षम आमदारांवर निशाना साधत काँग्रेसच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजुरांनी तहसील कार्यालयावर जनआक्रोश तिरडी मोर्चा काढला.
स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमधून निघालेल्या जनाक्रोश मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत सरकारची तिरडी काढली. अनिल ढोरे व विनायक गायवाडे यांनी मुंडन करून निषेध नोंदविला. मोर्चाचे नेतृत्व करताना विक्रम ठाकरे यांनी शासनाच्या धोरणांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ज्यावेळी मुख्यमंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी ते शेतकºयांचा कळवळा व्यक्त करीत होते. आता सत्तेत येताच त्यांनी शेतकरीविरोधी धोरण अवलंबले आहे. यासोबतच त्यांनी आ. अनिल बोंडे यांच्यावरसुद्धा तोंडसुख घेतले. काँग्रेसने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आशिष बिजवल यांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे, वासुदेव पोहरकर, ताराबाई बारस्कर, दिनेश आंडे, मनोज गेडाम यांनी मार्गदर्शन केले. गिरीश कराळे, राष्ट्रवादीचे नीलेश मगर्दे, धनंजय बोकडे, प्रशांत धुर्वे, बाळू पाटील, जितू शहा, बाबाराव मांगरुळकर, पांडुरंग घोरमाडे यावेळी उपस्थित होते.