शासकीय अभियांत्रिकीत विकास शुल्क कशासाठी?
By admin | Published: February 17, 2016 12:06 AM2016-02-17T00:06:44+5:302016-02-17T00:06:44+5:30
येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून घेतल्या जाणाऱ्या विकास व अन्य शुल्कांवर विद्यार्थ्यांनी तीव्र नापसंगी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांचा सवाल : दरवर्षीच्या वाढीवर आक्षेप, युवासेना आंदोलनाच्या पवित्र्यात
अमरावती : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून घेतल्या जाणाऱ्या विकास व अन्य शुल्कांवर विद्यार्थ्यांनी तीव्र नापसंगी व्यक्त केली आहे. या अभियांत्रिकी महाविद्यालयाला शासनच निधी पुरविते. कर्मचारी आणि प्राध्यापकांचे पगारही शासन करत असताना विकास शुल्क घेण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ‘आॅटोनामस’ महाविद्यालय असताना २०१५-१६ या वर्षासाठी २६,२४० रुपये विकास शुल्क व १९,५२८ रुपये इतर शुल्क घेतल्या गेले. २०१३-१४ मध्ये २१,०६५ रुपये विकास शुल्क व १५,५२१ रुपये अन्य शुल्क व २०१४-१५ मध्ये २३,१७१ रुपये विकास शुल्क व १७,०७३ इतर शुल्क घेतल्या गेले. दरवर्षी या शुल्क आकारणीत वाढ होत आहे. व्यवस्थापकाने विकासाच्या नावावर विद्यार्थ्यांना लुटत असल्याचा आरोप होत आहे. इंजिनिअरिंग करतेवेळी विद्यार्थ्यांचा कल हा सर्वाधिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे अधिक असतो. शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय ‘आॅटोनामस’ आहे. परंतु खासगी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शुल्क जवळजवळ सारखे आहे. त्यातही विकास शुल्काच्या नावावर कुठले विकासकामे केली जातात तसेच अन्य शुल्कांमध्ये कोणत्या शुल्कांचा अंतर्भाव आहे, हे सुद्धा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून सांगितले जात नाही. या महाविद्यालयाने चालविलेली ही पठाणी वसुली बंद करावी अन्यथा युवा सेना ‘दे दणका’ आंदोलन करेल, असा इशारा उपजिल्हा प्रमुख आशीष ठाकरे यांनी दिला आहे.