महसूल कर्मचाऱ्यांच्या आश्वासनांचा शासनाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:23 AM2019-07-25T01:23:12+5:302019-07-25T01:24:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून सहा वर्षे उलटूनही याबाबत शासनाने अद्याप पर्यंत आदेश न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून सहा वर्षे उलटूनही याबाबत शासनाने अद्याप पर्यंत आदेश न काढल्याने जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने २३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सदर आश्वासनाची पूर्तता न केल्यास पुन्हा ३० जुलै रोजी काळया फिती लावून कामकाज व विविध टप्प्यावर आंदोलन करण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.
शासनाने दखल न घेतल्यास संघटना विविध टप्प्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा अध्यक्ष नामदेव गडलिंग यांनी दिला आहे. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४३०० वरून ४६०० रुपये करावा, महसूल लिपिकांचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करावे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे, अव्वल कारकून वर्ग-३ संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गातील पदोन्नती मिळावी, दांगट समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करावी, एमपीएससी च्या परीक्षेत तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पदासाठी गृहविभागाच्या धरतीवर महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांची साठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जीवन देशमुख, के.एस. रघुवंशी, डी.एस. पवार, भास्कर रिठे, डी.एस. कपाडे, संतोष गायकवाड, राजेश भांडे, सुमेरसिंह राठोड, श्याम मिश्रा, विनोद भगत, संजय शिंदे, संदीप वानखडे, मंगेश माहुलकर, अरुण भारती, मोहन शिंदे आदींचा सहभाग होता.