दादासाहेब कन्नमवार यांचा शासनाला विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 04:51 PM2019-01-09T16:51:12+5:302019-01-09T17:10:17+5:30
स्वतंत्र महाराष्ट्र राज्यानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे स्व. दादासाहेब ऊर्फ मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती व पुण्यतिथीचा शासकीय परिपत्रकात शासनाला विसर पडला आहे.
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे (अमरावती)
स्वतंत्र महाराष्ट्र राज्यानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे स्व. दादासाहेब ऊर्फ मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती व पुण्यतिथीचा शासकीय परिपत्रकात शासनाला विसर पडला आहे. काढलेल्या या पत्रकात साधा नामोल्लेखही नसल्याने त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाच्यावतीने राष्ट्रपुरुष तथा थोर व्यक्तींची जयंती तसेच पुण्यतिथी साजरी करण्याबाबत परिपत्रक काढण्यात येते. २६ डिसेंबर रोजी असे परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकात राज्याचे पहिले मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांच्यासह ११ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले विदर्भातील स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा उल्लेख आहे. परंतु, स्वतंत्र राज्यात दुसरे मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सांभाळून पदावर असताना मृत्यू पावलेले मारोतराव कन्नमवार यांचे नाव या परिपत्रकात नसल्यामुळे बेलदार समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.
भारताच्या लढ्यात कन्नमवार यांचे योगदान
भारताच्या लढ्यात स्व. मारोतराव कन्नमवार यांचे मोलाचे योगदान होते. त्यांचा जन्म चंद्रपूर येथे १० जानेवारी १९०० मध्ये झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जुबली हायस्कूल येथे झाल्यानंतर त्यांनी १९१८ मध्ये भारत स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांनी देशांच्या स्वातंत्र्यासाठी हातभार लावला. महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. अनेक लढ्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे केंद्रात मंत्री म्हणून गेल्यानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून स्व. दादासाहेब ऊर्फ मारोतराव कन्नमवार यांनी कार्यभार सांभाळला. पदावर असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
बेलदार समाजाचा लढा कायम
प्रत्येक राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथीचे परिपत्रक शासनमार्फत दरवर्षी काढली जाते. परंतु, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या थोर पुरुषाचा शासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. शासकीय परिपत्रकात जयंती तथा पुण्यतिथी नोंद घेतल्यास शाळा महाविद्यालये स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय व निमशासकीय कार्यालयात या थोर पुरुषांची जयंती साजरी होऊ शकते. मात्र, शासन दखल घेत नसल्याची खंत बेलदार समाजाने व्यक्त केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळापासून दरवर्षी शासनाला पत्रव्यवहार करण्याचे काम बेलदार सेवा समिती करते. या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शासकीय परिपत्रकात कन्नमवार यांचे नाव समाविष्ट व्हावे म्हणून बेलदार समाजाचा लढा कायम आहे.
गतवर्षी राज्यमंत्री मदन येरावार यांना पत्रव्यवहार केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले. मात्र, माजी मुख्यमंत्री स्व.मारोतराव कन्नमवार यांच्या जयंतीची नोंद प्रसिद्ध झालेल्या शासकीय परिपत्रकात केली नाही.
- राजेंद्र बढिये, अध्यक्ष, बेलदार समाज संघर्ष समिती, नागपूर