कामबंद आंदोलनाने शासकीय आरोग्य यंत्रणा कोलमडली
By admin | Published: July 2, 2014 11:11 PM2014-07-02T23:11:02+5:302014-07-02T23:11:02+5:30
राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयीन यंत्रणा कोलमडली आहे. बुधवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही निगरगट्ट प्रशासनाने अद्यापर्यंत
अमरावती : राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयीन यंत्रणा कोलमडली आहे. बुधवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही निगरगट्ट प्रशासनाने अद्यापर्यंत कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे आरोग्य सेवा पुरविण्यास यंत्रणा तोकडी पडत असून रुग्णांचे बेहाल झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या मागील कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्यावतीने उपोषण सुरु करण्यात आले आहे. या कामबंद आंदोलनामुळे जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सुमारे ३५ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. मात्र त्यापैकी ५ वैद्यकीय अधिकारीच आरोग्य सेवा देत आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता कक्ष, साथरोग विषयक कामकाज अशा अनेक विभागात आरोग्य सेवा देण्यास यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांवर उपचार होण्यास दिरंगाई होत आहे. असेच हाल जिल्हा स्त्री रुग्णालायतही पाहायला मिळत असून केवळ आपत्कालीन यंत्रणा तेथे कार्यरत ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रसूतीकरिता आलेल्या महिलांकडे दुर्लक्ष होत आहे.
आधीच वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त पदे आहेत. त्यातच कामबंद आंदोलन सुरु असल्याने रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणारी सर्व यंत्रणा कोलमडली आहे. बुधवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आंदोलन चिघळण्याचे संकेत दिसत आहे.
आंदोलन लवकरच न संपल्यास जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आरोग्य सेवा पूर्णपणे ढासळण्यास शासनच कारणीभूत ठरणार आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शासनाविरुध्द तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या आंदोलनात संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी प्रमोद रक्षमकर, एकनाथ भोपळे, महिला सचिव उज्ज्वला पाटील, उमाकांत गरड, अश्विन पाटील, राजेश गायकवाड यांच्यासह आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आंदोलनात सहभाग आहे. (प्रतिनिधी)