संवैधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली: नागनाथ कोतापल्ले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 05:35 PM2019-12-22T17:35:33+5:302019-12-22T17:37:37+5:30

देशात अनेकदा क्रांती आणि प्रतिक्रांती घडली आहे. १९२५ पासून देशात तीन प्रमुख विचारप्रवाह कार्यरत झाले.

government not following the values of constitutional :Nagnath Kottapalle | संवैधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली: नागनाथ कोतापल्ले 

संवैधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली: नागनाथ कोतापल्ले 

googlenewsNext

अमरावती : संविधानाला न बदलविता संवैधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली केली जात असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले. प्रगतिशील लेखक संघाच्या अमरावती येथील चौथ्या अधिवेशनाच्या उद्घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरून कोतापल्ले रविवारी बोलत होते. त्यांच्या मते, पुरातन काळापासून या देशात ब्राह्मण संस्कृती आणि श्रमण संस्कृती, असा संघर्ष सुरू आहे. 

देशात अनेकदा क्रांती आणि प्रतिक्रांती घडली आहे. १९२५ पासून देशात तीन प्रमुख विचारप्रवाह कार्यरत झाले. १९२५ मध्येच ब्राह्मणेतर काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. देशामध्ये महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समतेची चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ अशा परिवर्तनाच्या चळवळींनी देशात वाटचाल केली. त्याचवेळी देशातील सनातन, कर्मठ रुढी परंपरावादी व वर्चस्ववादी विचारांनी संघटित होण्याचे व पुरोगामी चळवळीला प्रतिकार करण्याचे काम केल्याचे कोतापल्ले म्हणाले. 

स्वातंत्र्यानंतर भारतीय संस्कृतीत व सर्वसामान्य शोषित पीडित समाजाच्या कल्याणाचा घटनेत अंर्तभाव करून राज्यघटना अस्तित्वात आली. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संविधानात भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब नाही व ती काहीच कामाची नाही, असे सांगून घटनेला गोधडी संबोधले होते. त्यानंतर ज्यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही, अशा लोकांच्या हातात देशाची सत्तासूत्रे असल्यामुळे ते गोळवलकरांचा 'दी बंच ऑफ थॉट' यातील विचारावर आधारित भारत घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच देशात सध्या विभाजनाची, असंतोषाची व अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा भारतीय फॅसिझम नव्या स्वरुपाचा असून मानव जातीला कल्याणकारी ठरणारा नाही, असे कोतापल्ले म्हणाले. 
  
सिने अभिनेते तथा लेखक वीरा साथीदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रलेसंचे राष्ट्रीय सचिव तथा हिंदी साहित्यिक विनीत तिवारी यांनी बीजभाषण केले. यावेळी हिंदी साहित्यिक उषा आठल्ये(छत्तीसगढ) जी. के. एनापुरे, शाहीर शीतल साठे, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे व्यासपीठावर उपस्थित होते. या अधिवेशनास कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे कार्यक्रमाचे समन्वयक प्रसेनजित तेलंग होते. यावेळी श्रीराम पवार (मुंबई), प्रवीण बनसोड (विदर्भ), समाधान वानखडे (मराठवाडा), दत्ता घोलप (पश्र्चिम महाराष्ट्र), संदीप पवार (कोकण) व उत्तर महाराष्ट्रातील अहवाल वाचन प्रमोद अहिरे यांनी केले. प्रास्ताविक राकेश वानखडे, तर स्वागतपर भाषण काशिनाथ बऱ्हाटे यांनी केले.  संचालन मंगेश भुताडे यांनी केले, तर आभार प्रसेनजित तेलंग यांनी मानले.

Web Title: government not following the values of constitutional :Nagnath Kottapalle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.