शासकीय कार्यालयातील परिचराला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:46 AM2019-09-18T01:46:38+5:302019-09-18T01:47:12+5:30
परिचर मंगेश गावले नेहमीप्रमाणे कार्यालयातील कामे करीत असताना अचानक लाल माकडांचा कळप कार्यालयात शिरला. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी मंगेश गावले यांच्या हाताला चावा घेत जखमी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : पर्यटनस्थळावर हैदोस घालणाऱ्या लाल माकडांनी त्यांचा मोर्चा आता शासकीय कार्यालयांकडे वळविला आहे. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास अप्पर प्लेटो स्थित जिल्हा परिषद सिंचन उपविभागातील कर्मचाºयाला माकडाने चावा घेऊन रक्तबंबाळ केले.
परिचर मंगेश गावले नेहमीप्रमाणे कार्यालयातील कामे करीत असताना अचानक लाल माकडांचा कळप कार्यालयात शिरला. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी मंगेश गावले यांच्या हाताला चावा घेत जखमी करण्यात आले. कार्यालयात उपस्थित जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, ईश्वर राठोड, मालती तायडे, पी.एन. ढोकणे, उपकोषागार कार्यालयाचे पांडे व सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर उपचार करण्यात आला.
लाल माकडांच्या हैदोसापासून सुटका व्हावी, यासाठी नागरिकांनी वनविभाग आणि नगरपालिकेला पत्र दिले आहे. मात्र, या मोहिमेला अद्याप मुहूर्त लाभला नाही. माकडांनी स्थानिक नागरिक, पर्यटकांपाठोपाठ शासकीय कार्यालयाकडे मोर्चा वळविल्याने कर्मचाºयांमध्ये दहशत पसरली आहे.
उड्या मारत फायली पाडल्या
कार्यालयीन वेळ असल्याने कर्मचारी अधिकारी आपल्या कामात व्यस्त होते. अचानक शिरलेल्या माकडांनी खाण्यासाठी काही मिळते का, याचा शोध घेतला. मात्र, काहीच मिळत नसल्याने एका खोलीतून दुसºया खोलीत जाताना टेबलावरून अलमारी, खुर्च्यांवर उड्या मारल्या. त्यामुळे उपस्थित कर्मचारी घाबरले. कर्मचाºयांनी मोठ्या हिमतीने हातात काठ्या घेऊन या माकडांना हुसकावून लावले. या माकडांची चिखलदरा शहरात दहशत कायम आहे.