गहू, मका, ज्वारीची होणार शासकीय खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:24+5:302021-04-16T04:13:24+5:30
अमरावती : शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगामातील ज्वारी, मका व गहू खरेदीकरिता तालुकास्तरावर पीक ...
अमरावती : शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगामातील ज्वारी, मका व गहू खरेदीकरिता तालुकास्तरावर पीक पेऱ्यानुसार खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील संबंधित खरेदी केंद्रावर एप्रिलच्या ३० एप्रिलपर्यंत धान्याची नोंदणी करता येईल.
गहू धान्यासाठी १९७५ रुपये आधारभूत किंमत असून अमरावती, भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अमरावती तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या. हे खरेदी केंद्र आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यासाठी नांदगाव तालुका सह. शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या., चांदूर रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार आदी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संबंधित तालुक्याचे तालुका सह. शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या. हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
ज्वारी धान्यासाठी २६२० रुपये आधारभूत किंमत असून तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या. हे खरेदी केंद्र उभारण्यात आले आहे. मका धान्यासाठी १८५० रुपये आधारभूत किंमत असून चांदूर रेल्वे तालुक्यात सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या. व मोर्शी तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या. खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
मेळघाटच्या शेतकऱ्यांसाठी धारणी, चिखलदरा तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाव्दारे खरेदी केंद्रे सुरू केली असून तेथे मका व गहू खरेदी केल्या जाईल. धारणी तालुक्यात बैरागड, हरीसाल, सावलीखेडा, चाकर्दा, साद्राबाडी, चुरणी तर चिखलदरा तालुक्यात चुरणी व गौलेखेडा बाजार येथे धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. उपरोक्त ठिकाणी त्या-त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी धान्याची नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर तसेच जिल्हा मार्केटिंग कार्यालय व धारणी आदिवासी विकास महामंडळाव्दारे करण्यात आले आहे.
बॉक्स
नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक
धान्य खरेदी नोंदणीसाठी रब्बी पणन हंगाम २०२०-२१ मधील तलाठीच्या सही शिक्कानिशी पिकपेरा, ऑनलाईन सात-बारा, आधारकार्ड, आधार लिंक असलेले बँक खाते क्रमांक, बँक पासबुक आदी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन खरेदी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेचे खाते क्रमांक सादर करु नये, असे नोंदणी अधिकाऱ्यांनी सांगितले.