उत्पन्नाच्या वर्गीकरणावर राहणार शासकीय सचिव, बाजार समित्यांमध्ये नि:पक्ष कारभाराचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 04:55 PM2017-09-08T16:55:42+5:302017-09-08T16:55:59+5:30
बाजार समित्यांचे सचिव हे त्या बाजार समितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारीच असतात. मात्र, अनेक बाजार समित्यांमध्ये कनिष्ठ कर्मचा-यांना सचिवपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने व नि:पक्षपाती कारभार होत नाही. आता बाजार समित्यांच्या उत्पन्नाच्या वर्गीकरणानुसार सहकार विभागाच्या अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
गजानन मोहोड
अमरावती, दि. 8 - बाजार समित्यांचे सचिव हे त्या बाजार समितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारीच असतात. मात्र, अनेक बाजार समित्यांमध्ये कनिष्ठ कर्मचा-यांना सचिवपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने व नि:पक्षपाती कारभार होत नाही. आता बाजार समित्यांच्या उत्पन्नाच्या वर्गीकरणानुसार सहकार विभागाच्या अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार अधिक कार्यक्षमतेने व नि:पक्षपणे चालविण्यात सचिवांचा मोठा वाटा आहे. याबाबतीत पणन् अधिनियमाचे कलम ३५ (१) याअन्वये पणन् मंडळाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सचिवांचे पॅनल पूर्ण करावयाचे आहे व बाजार समित्यांद्वारा त्या पॅनलमधूनच सचिवांच्या नियुक्ती करावयाच्या आहेत. तथापि नियुक्तीबाबतचे आदेश न्यायप्रविष्ट असल्यामुळे बाजार समित्यांनी कनिष्ठ कर्मचा-यांना पदोन्नती देऊन कामकाज चालविले. त्यामुळे बाजार समित्यांचे कामकाज पूर्ण क्षमतेने चालविणे अशक्य असल्याचे सहकार विभागाने ४ सप्टेंबरच्या आदेशाने स्पष्ट केले आहे.
बाजार समितीचे सचिवपद हे एकलपद असल्याने ते आता सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे व उत्पन्नाच्या वर्गीकरणानुसार सहकार विभागातील विविध अधिका-यांची नियुक्ती करणे शक्य असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबतचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पणन् संचालक व पणन् विभागाच्या उपसचिवांना दिले आहेत. याच अनुषंगाने विविध अधिका-यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव देखील तातडीने मागितला आहे.
३०७ पैकी २०१ बाजार समित्यांवरच नियमित सचिव
- राज्यात ३०१ बाजार समित्या आहेत. यापैकी २०१ ठिकाणीच नियमित सचिव आहेत. ९८ बाजार समित्यांमध्ये प्रभारी सचिव व ८ बाजार समित्यांंमध्ये सचिव पदच रिक्त आहे.
- वर्गवारीनुसार १ ते ५ कोटींच्या आतील बाजार समितीवर सहायक निबंधक दर्जाचे अधिकारी, ५ ते १० कोटींच्या बाजार समितीवर उपनिबंधक दर्जाचे, १०-२० कोटींच्या आतील ठिकाणी सहनिबंधक दर्जाचे व २० कोटींच्यावर उत्पन्नाच्या ठिकाणी अपर निबंधक दर्जाचे अधिकारी देण्यात येणार आहेत.
पणन् संचालकांनी बाजार समित्यांकडून मागविले ठराव
बाजार समित्यांनी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे शासकीय अधिका-यांना प्रतिनियुक्ती देण्याचा ठराव पणन् संचालकांना सादर करण्याचे आदेश १४ आॅगस्टच्या पत्रान्वये दिले आहेत. शासकीय अधिकारी प्रतिनियुक्तीने दिल्यास त्याअधिका-याचे वेतन, अनुषंगिक भत्ते बाजार समित्यांना अदा करावे लागणार आहे. त्यादृष्टीने बाजार समित्या सक्षम आहेत काय? याबाबतचा उल्लेख ठरावात करून जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.