सरकारने अनाथ, एकल बालकांचा निधी रोखला; यशोमती ठाकूर यांचे सरकारवर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 11:34 AM2022-09-23T11:34:34+5:302022-09-23T11:39:30+5:30
बाकीच्या गोष्टी या सरकारला चालतात आणि ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी हे सरकार निर्दयीपणे निर्णय घेत आहे, असे ठाकूर म्हणाल्या.
अमरावती : राज्याच्या ‘ईडी’ सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा चालविला आहे. एवढेच नव्हे तर अनाथ, एकल बालकांचा निधी रोखणारे हे ‘ईडी’ सरकार निर्दयी असल्याचे सांगत महिला व बाल विकास विभागाच्या माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. ॲड. ठाकुरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. मंगलप्रभात लोढांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
ईडी सरकारने महाविकास आघाडीचे सर्व निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. काही निर्णय त्यांच्या फायद्यासाठी बदलून घेतले. मात्र, जिथे अनाथ बालकांचा, एकल महिलांचा, दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या हितासाठी घेतलेला निर्णय हे सरकार कसे काय बदलू शकते. सरकारमधील ही लोक असंवेदनशील आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाला महिला व बाल कल्याण विभागाचा मंत्री केले आहे. त्याला फक्त काँक्रीट जंगल बांधता येते, त्यांची हृदय देखील काँक्रीट आहेत. अर्थ खात्याने देखील यावर नकारात्मक शेरा दिला आहे. या सर्व बाबींचा निषेध माजी मंत्री ॲड. ठाकूर यांनी केला आहे.
बाल संगोपनासाठी प्रत्येक लाभार्थीला दरमहा दोन हजार ५०० रुपये मिळावेत, यासाठी महिला व बाल विकास मंत्री म्हणून मी पाठपुरावा केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. बाकीच्या गोष्टी या सरकारला चालतात आणि ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी हे सरकार निर्दयीपणे निर्णय घेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया ॲड. यशोमती ठाकूर दिली.