घुईखेड येथे 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रम
By admin | Published: May 4, 2016 12:41 AM2016-05-04T00:41:30+5:302016-05-04T00:41:30+5:30
जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पग्रस्त आठ गावांचे पुनर्वसन सन २००६-०७ मध्ये झाले असले....
ग्रामस्थांची तक्रार : मूलभूत सुविधांचा अभाव
चांदूररेल्व : जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पग्रस्त आठ गावांचे पुनर्वसन सन २००६-०७ मध्ये झाले असले तरी मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याचे ग्रामस्थांनी स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना सांगितले. ते जनसुनावणीच्या कार्यक्रमाला येथे आले होते.
भूमी अधिग्रहण अधिनियम २०१३ नुसार २५ नागरी सुविधांचा लाभ सर्व गावकऱ्यांनना तातडीने देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली. पुर्नवसन व घरबांधणी अनुदान म्हणून रुपये ५० हजार रुपये देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतातील माल चोरीला किंवा वन्यप्राण्यांकडून नुकसान होऊ नये, तारेचे कुंपण शासनाकडून पुरविण्यात यावे. आठ प्रकल्पग्रस्त गावांमध्ये हँडपंप सुविधा व पिण्याचे पाण्याची टँकर सुविधा सुरळीत करण्यात यावी. तसेच गावांतील सर्व विज जोडण्या नवीन करण्यात याव्यात. अशा विविध मागण्या तिवारीसमोर मांडल्या.
यावर तिवारी व जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सर्व गावकऱ्यांंना योग्य मार्गदर्शन केले. घुईखेड येथील जनसुनावणीला कृष्णकुमार टावरी, जि.प. सदस्य प्रवीण घुईखेडकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रेय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वानखडे, जिल्हा शल्य चिकित्यक राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव, उपविभागीय अधिकारी विधाते, तहसीलदार बढीये, बेंबळा प्रकल्पाचे अभियंता महल्ले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)