अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक हौजकटोराकडे शासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:40 PM2020-09-20T17:40:30+5:302020-09-20T22:00:58+5:30
वऱ्हाडाची राजधानी म्हणून एखाद्या भाग्यवान महाराणीप्रमाणे ऐश्वर्य सुखाचा अनुभव घेतलेले शहर अचलपूर कालचक्रात हे दिवस नाहीसे झालेत. पण, त्या काळातील हा हौजकाटोरा आजही काळाशी झुंज देताना दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: गत काळातील ऐश्वर्याची आठवण करून देणारी अचलपुरातील एतिहासिक वास्तू हौजकटोरा दुर्लक्षित ठरत आहे. पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या पठाणकालीन शिल्पाची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. पडझडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
वऱ्हाडाची राजधानी म्हणून एखाद्या भाग्यवान महाराणीप्रमाणे ऐश्वर्य सुखाचा अनुभव घेतलेले शहर अचलपूर कालचक्रात हे दिवस नाहीसे झालेत. पण, त्या काळातील हा हौजकाटोरा आजही काळाशी झुंज देताना दिसत आहे.
त्या काळातील राजा-राणीच्या जीवनातील सौख्य उपभोगण्याचे ते रमणीय ठिकाण. जल विहाराकरिता याची खास निर्मिती म्हणून जलमंदिर, अशी ओळखही कोट्याप्रमाणे आकार असलेल्या तलावाच्या मध्यभागी ही अष्टकोणी वास्तू उभी आहे. त्यामुळे या जलमहलाच्या पहिल्या मजल्यावर नौकेव्दारा जावे लागत असे. इ. स. १४१६ मध्ये अहमदशहा वली बहामनी यांनी या हौजकटोऱ्याची निर्मिती केली. बांधकामही करवून घेतले. देवगिरीच्या हिंदू राज्याचा पूर्ण उच्छेद झाल्यापासून तो इ.स. १८५३ पर्यंत वऱ्हाडावर मोगल राजसत्ता होती. एलीचपूर त्या सत्तेचे केंद्र होते. बहामदशहाच्या वंशाने पुढे १५० वर्षे राज्य केले. त्यामुळे या इमारतीकडे इमादशाहीचे अवशेष म्हणूनदेखील बघितले जाते.
पठाणकालीन शिल्प
पठाणकालीन शिल्प कला असलेली ही इमारत एका वक्राकार तलावाच्या मध्यभागी उभी आहे. दगडावर दगड ठेवून ही अष्टकोणी इमारत दगडाने बांधलेली आहे. या इमारतीच्या आठही बाजूंनी कमानीदार खुले दरवाजे आहेत. दगडांवर सर्वत्र सुंदर कोरीव नक्षीकाम आहे. बºयाच भागात वेली कोरल्या गेल्या आहेत. आजच्या शिल्पास्त्राला आव्हान ठरणारी ही इमारत लक्षवेधक ठरली आहे. आज या अष्टकोणी इमारतीचे तीन मजले दिसत असले तरी ही इमारत पाच मजली असल्याची नोंद आहे. या इमारतीला असलेले आकर्षक तळघर गाळाखाली दबल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या इमारतीचा ४ था व ५ वा मजला तोडून त्या एका नबाबाने ते साहित्य आपल्या राजवाड्याकरिता वापरल्याचे सांगितले जाते. ज्या तलावाच्या मध्यभागी ही इमारत आहे, त्या तलावात अंडरग्राउंड पाईपच्या सहाय्याने गुरूत्वाकर्षणशक्तीने धामणगाव गढीवरू न पाणी आणल्या जात असल्याची नोंद इंग्रजांनी गॅझेटमध्ये घेतली आहे.
इमारतीची पडझड
प्राची स्मारक व पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष अधिनियमांतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या इमारतीसह लगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. संरक्षित स्मारकाचा दर्जा प्राप्त हौजकटोराच्या डागडुजीला सुरूवात केली होती. तसा प्रस्ताव दिल्लीदरबारी सादरही करण्यात आला. पण दोन वर्षांपासून या इमारतीची दुरुस्ती व डागडुजी झालेली नाही. पडझडीचे प्रमाण वाढले असून, मोठ्या प्रमाणात या इमारतीची पडझड होत आहे. पडझडीमुळे ही इमारत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.