राज्यपालांचा दौरा; आदिवासी विकास विभाग लागला कामाला
By admin | Published: October 29, 2015 12:37 AM2015-10-29T00:37:00+5:302015-10-29T00:37:00+5:30
राज्यपाल विद्यासागर राव २ नोव्हेंबर रोजी मेळघाटच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनासह आदिवासी विकास विभागाने आढावा बैठकी घेण्याचे सत्र युद्धस्तरावर चालविले आहे.
बैठकांचे सत्र सुरु : प्रभारी अप्पर आयुक्तांनी घेतला आढावा
अमरावती : राज्यपाल विद्यासागर राव २ नोव्हेंबर रोजी मेळघाटच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनासह आदिवासी विकास विभागाने आढावा बैठकी घेण्याचे सत्र युद्धस्तरावर चालविले आहे. कुपोषण, बाल, मातामृत्यू रोखण्यासाठी आतापर्यंतच्या उपाययोजनांची आकडेवारी जुळविली जात आहे.
राज्यपाल राव यांचा मेळघाट दौरा निश्चित होताच जिल्हा प्रशासनातर्फे विभागनिहाय बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनीे संपूर्ण विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती संकलन करण्यास प्रारंभ केला आहे. मेळघाटला कुपोषणाचा लागलेला कलंक पुसून काढण्यासाठी शासन योजनांची अंमलबजावणी करुन माता व बालमृत्यू रोखण्यास खरेच यश मिळाले काय? ही वस्तुस्थितिजन्य आकडेवारी राज्यपालांच्या पुढ्यात जिल्हाधिकाऱ्यांना ठेवायची आहे. त्यामुळे आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच आदिवासी विकास विभागाला लक्ष्य करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी गित्ते यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला आदिवासी विकास विभागाच्या प्रभारी अप्पर आयुक्त माधवी खोडे देखील आवर्जुन उपस्थित होत्या. वर्षभरात मेळघाटात कुपोषणासंदर्भात काही सुधारणा झाली अथवा नाही, हे प्रशासन आढावा बैठकातून जाणून घेत आहे. दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या प्रभारी अप्पर आयुक्त माधवी खोडे बुधवारी धारणी दौऱ्यावर होत्या. त्यांनी आदिवासी आश्रम शाळा, वसतिगृहे, महाविद्यालयांचा दौरा करुन माहिती जाणून घेतली.