४२ क्रीडाप्रकारांसाठी मिळणार ‘ग्रेस मार्क’
By Admin | Published: April 1, 2016 11:57 PM2016-04-01T23:57:00+5:302016-04-01T23:57:00+5:30
इयत्ता १०, १२ वी मधील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी दिले जाणारे क्रीडा सवलतीचे वाढीव गुण (ग्रेस मार्क) ४२ खेळांसाठी दिले जाणार आहेत.
१०, १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सवलत : ३० एप्रिलपर्यंत प्रस्तावाची मुदत
अमरावती : इयत्ता १०, १२ वी मधील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी दिले जाणारे क्रीडा सवलतीचे वाढीव गुण (ग्रेस मार्क) ४२ खेळांसाठी दिले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या खेळाडंूनाच १५, २० असे ग्रेस मार्क दिले जाणार आहेत.
शालेय क्रीडा स्पर्धेत सुमारे ९२ खेळांचा समावेश आहे. यापैकी ४२ खेळांतील राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत सहभाग व प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंनाच वाढीव गुण देण्याचा निर्णय क्रीडा व युवक संचालनालयाने घेतला आहे. शासनाने क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण देण्याबाबतच्या सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी सन २०१५-१६ शालेयसत्रापासून करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षांपासून क्रीडागुण सवलतीचा लाभ घेणाऱ्या पात्र एकविध खेळ संघटना, विभागीय उपसंचालक तसेच जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. क्रीडागुण सवलतींचे प्रस्ताव स्वीकारत नसल्याची तक्रार खेळाडू व पालकांनी क्रीडा संचालनालयाकडे केली आहे. त्यामुळे त्वरित प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश क्रीडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. संघटनांद्वारे प्राप्त राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील सहभागी व प्रावीण्यप्राप्त खेळाडूंच्या नावांचा प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळांना गुणांच्या शिफारशीसहित ३० एप्रिलपर्यंत सादर करता येणार आहे. यामुळे क्रीडापटू आनंदलेत.(प्रतिनिधी)
वाढीव गुणांमध्ये या खेळांचा समावेश
अॅथेलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, बेसबॉल, बुद्धिबळ, क्रिकेट विनू मंकड, क्रिकेट सी.के. नायडू, सायकलिंग रोडरेस, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, ज्युदो, कबड्डी, खो-खो, लॉन टेनिस, नेटबॉल, रोलर स्केटिंग, रोलर हॉकी, रोलबॉल, रायफल शूटिंग,जलतरण, डायव्हिंग, सॉफ्टबॉल, टेबलटेनिस, तायक्वांडो, व्हॉलिबॉल, कुस्ती, वेटलिफ्टिंग, योगा, सुब्रतो कप फु टबॉल, नेहरु कप हॉकी, मल्लखांब, बॉलबॅडमिंटन, कॅरम, डॉजबॉल, किक बॉक्सिंग, सिकई मार्शल आर्ट, थ्रो-बॉल
असे मिळतील गुण
राज्यस्तरीय सहभाग- १५ गुण
राज्यस्तरीत प्रावीण्य- २० गुण
राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग- २० गुण
राष्ट्रीय स्पर्धेत प्रावीण्य- २५ गुण
आंतरराष्ट्रीय सहभाग व प्रावीण्य- २५ गुण
राज्य स्पर्धेत पहिले तीन संघ- २० गुण
राज्य स्पर्धेत उर्वरित पाच संघ- १५ गुण
शाळा-विद्यालयांनी ग्रेस गुणांसाठी १५ एप्रिलपर्यंत क्रीडा विभागाला प्रस्ताव सादर करणे अनिवार्य आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या ग्रेस गुणांचा प्रस्ताव बोर्डाकडे क्रीडा विभागाकडून पाठविला जाईल.
- अविनाश पुंड
जिल्हा क्रीडा अधिकारी