पदवीधर मतदारसंघ निवडणूक; भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 12:28 PM2023-01-12T12:28:12+5:302023-01-12T12:29:05+5:30
हॅट्ट्रिक साधणार, विजयाचा केला दावा
अमरावती : पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना (बाळासाहेब) व रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा अखेरचा दिवस आहे.
डॉ. रणजित पाटील यांच्या समर्थनार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत येथील दसरा मैदानावर जनसंवाद सभा बुधवारी घेण्यात आली. यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांचे भाषण संपताच दुपारी अडीचच्या सुमारास रणजित पाटील यांनी विभागीय गाठले व उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) निवेदिता चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, पक्षाच्या वतीने दीड लाख पदवीधरांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे आपण बहुमताने निवडून येऊन हॅट्ट्रिक साधणार असल्याचा दावा त्यांनी केला.