हरभरा धोक्यात, घाटेअळीचा प्रादुर्भाव
By admin | Published: January 29, 2015 10:59 PM2015-01-29T22:59:40+5:302015-01-29T22:59:40+5:30
रबी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असणाऱ्या हरभऱ्यावर वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त
अमरावती : रबी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असणाऱ्या हरभऱ्यावर वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रबीच्या हरभऱ्यावर होती. मात्र घाटेअळींचा प्रादुर्भावामुळे सरासरी उत्पन्नात कमी येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात रबीसाठी १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी एक लाख १० हजार ५६९ हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र आहे. रबीच्या एकूण क्षेत्राच्या ७१ टक्के क्षेत्रावर हरभरा आहे. खरिपाच्या हंगामात पावसाच्या १२० दिवसांपैकी केवळ ४३ दिवस पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ८५० ते ९०० मिली सरासरी पाऊस पडायला पाहिजे. परंतु यंदा ५५० मिली पाऊस पडला त्यामुळे रबी हरभराची उगवणशक्ती कमी झाली. मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील हरभराची जमिनीत आर्द्रतेअभावी वाढ खुंटली आहे. खरिपाचा हंगाम लांबणीवर पडल्याने रबीचा हंगाम देखील दीड महिन्यांनी माघारला. काही भागातील हरभरा हा सध्या फुलोऱ्यावर आहे. काही भागात हरभऱ्याला घाटे याययला सुरुवात झाली आहे. जानेवारीच्या प्रारंभापासून वातावरणात बदल, ढगाळ वातावरण, धुके, थंडी तर कधी सूर्यप्रकाश हा वातावरणाचा बदल घाटेअळीला पोषक आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने पहिल्या टप्यात पेरणी झालेल्या हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब न झाल्यास काही दिवसांतच हरभरा पिकात ३० ते ४० टक्क्क््यांनी कमी होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. जिल्ह्यात रबीच्या हरभऱ्याची सर्वाधिक २२ हजार ५८२ हेक्टर पेरणी मोर्शी तालुक्यात झाली. दर्यापूर तालुक्यात २० हजार ३२०, धामणगाव तालुक्यात ७६ हजार ८१५ धारणी तालुक्यात ७ हजार ५८० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
हरभऱ्याच्या पानावर पांढरे ठिपके आढळत असल्यामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. या दिवसांत आठ दिवसांच्या फरकात कीटनाशकांची फवारणी करावी. रबीच्या हरभरा उत्पन्नात सरासरी घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)