ग्रा.पं. निवडणूक; ‘पत्नी’ला सरपंचपदाचा ताज चढविण्यासाठी ‘नवरोबा’ची लागतेय कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:46 PM2022-12-16T13:46:36+5:302022-12-16T13:47:05+5:30

मतदारांची केली जात आहे मनधरणी : ताई-बाई अक्का, सूनबाई, लेकीकडे लक्ष द्या!, अनेक ठिकाणी चुरशीचा सामना

Gram Panchayat Elections: closely contested in many places | ग्रा.पं. निवडणूक; ‘पत्नी’ला सरपंचपदाचा ताज चढविण्यासाठी ‘नवरोबा’ची लागतेय कसोटी

ग्रा.पं. निवडणूक; ‘पत्नी’ला सरपंचपदाचा ताज चढविण्यासाठी ‘नवरोबा’ची लागतेय कसोटी

googlenewsNext

अमरावती : सत्यवानासाठी व्रत करणाऱ्या सावित्रीने चार भिंतींच्या बाहेर पाऊल टाकून समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळविले आहे. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातही ती आघाडीवर आहे. १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या या निवडणुकीतही महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यातही सरपंच थेट मतदारांमधून निवडून दिला जाणार असल्याने या निवडणुकीला आणखीच महत्त्व आले आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी रिंगणात असलेल्या पत्नीला सरपंचपदी विराजमान करण्यासाठी पतीदेवांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये २५२ ग्रामपंचायतींकरिता रविवारी मतदान होणार असल्याने निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. पैकी पाच ग्रामपंचायतींत अविरोध निवडणूक झाली आहे. एकूण २५७ ग्रामपंचायतींत तब्बल ६१ ग्रामंपचायतींमध्ये सरपंचपद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांकरिता राखीव असल्याने अनेकांचे गणित बिघडले आहे. इच्छेवर पाणी फेरल्यामुळे आता आपण नाही, तर आपली पत्नी किंवा परिवारातील सदस्याला सरपंचाच्या रिंगणात उतरविले आहे. त्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरतही जोरदार सुरू आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अनेकजण मतदारांची मनधरणी करत आहेत. कुठे पती-पत्नी अर्ज भरल्यापासून मतदारांच्या भेटी घेत आहेत, तर कुठे मतदानाच्या तोंडावर पतीदेवासोबत पत्नीही घराबाहेर पडून मतांचा जोगवा मागत आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंचाच्या भोवताल केंद्रित असली तरीही सदस्यांनाही आपापल्या वॉर्डातून आपले वर्चस्व दाखवून द्यायचे असल्याने जवळपास आठशे महिला सदस्यपदाकरिता रिंगणात आहेत. त्यांच्याही पतीदेवांची सातत्याने धडपड सुरू आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासोबतच विरोधकांना रोखून धरण्यासाठी नवरोबांची चांगलीच कसोेटी लागली असून, कोण बाजी मारतो, हे निकालाअंती स्पष्ट होईलच.

या जागांकरिता होत आहे निवडणूक

  • एकूण ग्रामपंचायती - २५२
  • एकूण सरपंच संख्या - २५७
  • एकूण वॉर्ड संख्या - ८०८
  • एकूण सदस्य संख्या - २०९७
  • अविरोध सरपंच संख्या - ०५
  • अविरोध सदस्य संख्या - ४१३

Web Title: Gram Panchayat Elections: closely contested in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.