ग्रामपंचायत सदस्याने स्विकारली लाच; महिला सरपंच ‘ट्रॅप’

By प्रदीप भाकरे | Published: April 11, 2023 01:56 PM2023-04-11T13:56:53+5:302023-04-11T13:59:17+5:30

एसीबीची कारवाई : हस्तांतरणाच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी लाच

Gram Panchayat member accepts bribe; Women Sarpanch 'Trapped' | ग्रामपंचायत सदस्याने स्विकारली लाच; महिला सरपंच ‘ट्रॅप’

ग्रामपंचायत सदस्याने स्विकारली लाच; महिला सरपंच ‘ट्रॅप’

googlenewsNext

अमरावती : जल जीवन मिशन अंतर्गत पुर्ण झालेल्या पाईपलाईनच्या कामाचे हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या फॉर्मवर सही करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्विकारताना ग्रामपंचायत सदस्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. तर या सापळ्यात तेथील महिला सरपंचाविरूद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१० एप्रिल रोजी अमरावती एसीबीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली ते जामगाव फाटयादरम्यान हा ट्रॅप यशस्वी केला. बबिता संजय खानंदे (४३) व पंकज हरिदास तालन (३३, दोघेही रा. जामगाव, ता. नांदगाव खंडेश्वर) अशी लाचखोर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. यातील खानंदे ही जामगावची सरपंच असून, तालन हा ग्रामपंचायत सदस्य आहे.

यातील तक्रारदाराने जल जीवन मिशन पाणीपुरवठा अंतर्गत जामठी येथील पाईपलाईनचे काम पूर्ण केले. त्या कामाचे हस्तांतरण जामगाव ग्रामपंचायतला करून घेण्यासाठीच्या फॉर्मवर वा करारनाम्यावर सही करण्यासाठी सरपंच बबिता खानंदे हिने लाचेची मागणी केली. तशी तक्रार १० एप्रिल रोजी एसीबीला प्राप्त झाली. एसीबीने तत्काळ दखल घेत पडताळणी केली असता खानंदे व पंकज तालन यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी करुन ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्याचवेळी पंकज तालन याने ती रक्कम स्विकारताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
दोघांविरूद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई

अमरावती एसीबीचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षकद्वय सतिश उमरे व योगेशकुमार दंदे यांच्यासह पोलीस अंमलदार माधुरी साबळे, युवराज राठोड, आशिष जांभळे, वैभव जायले, बारबुध्दे यांनी ही यशस्वी कारवाई केली.

Web Title: Gram Panchayat member accepts bribe; Women Sarpanch 'Trapped'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.