ग्रामपंचायत सदस्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By admin | Published: June 12, 2017 12:18 AM2017-06-12T00:18:39+5:302017-06-12T00:18:39+5:30
तालुक्यातील सालई ग्रामपंचायतीतील एका सदस्याने अल्पवयीन मुलीला चार दिवस बंदिस्त ठेवून अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
चार दिवस डांबून ठेवले : आरोपीला एक दिवसाचा पीसीआर
पंकज लायदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील सालई ग्रामपंचायतीतील एका सदस्याने अल्पवयीन मुलीला चार दिवस बंदिस्त ठेवून अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. अनिल मोतीराम सावरकर असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३ जून रोजी अल्पवयीन पीडित सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिच्या बहिनीकडे जाण्यास निघाली होती. दरम्यान आरोपी अनिलने तिला पोहचवून देण्याची बतावणी केली. आपल्या बाईकवर बसवून त्याने गावालगत असलेल्या शेतातील झोपडीत आणले. चार दिवस तिला डांबून ठेवत शारीरिक संबंध स्थापित केले. चार दिवसांनंतर मुलगी घरी पोहोचली नाही. यामुळे घरात चिंतेचे वातावरण होते.
पीडितेनेच दिली माहिती
धारणी : चार दिवसांनंतर मुलीच्या वडिलांनी शोध सुरू केला होता. याची माहिती आरोपीला मिळताच त्याने तिला सोडून दिले. घडलेल्या प्रकाराची माहिती सदर मुलीने तिच्या पालकासमवेत धारणी पोलिसात तक्रार नोंदविता दिली.
या तक्रारीच्या आधारावर धारणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचारप्रकरणी भादंवि कलम ३६३, ३३६ (एन), ३४३, पास्को अॅक्ट अंतर्गत आरोपी अनिल सावरकर याला अटक केली.
अचलपूर न्यायालयाने याप्रकरणी आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किशोर गवई यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सविता वडदे करीत आहे.