'नाफेड'ची हरभरा खरेदी बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अधिकाऱ्यांना कोंडले

By गणेश वासनिक | Published: April 21, 2023 05:21 PM2023-04-21T17:21:13+5:302023-04-21T17:24:49+5:30

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करा, नुकसान झाल्यास नाफेडला दोषी ठरविण्याचा इशारा

Gram purchase of 'NAFED' stopped; The Swabhimani Shektar Sangathan (Swabhimani Shektar Sangathan) condemned the officials | 'नाफेड'ची हरभरा खरेदी बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अधिकाऱ्यांना कोंडले

'नाफेड'ची हरभरा खरेदी बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अधिकाऱ्यांना कोंडले

googlenewsNext

अमरावती : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि, मुंबई (नाफेड) जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी हरभरा खरेदी बंद केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान अधिकाऱ्यांना दालनात कोंडून ठेवण्यात आले, यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा ईशारा देण्यात आला. यावेळी खराब झालेला चणा नाफेड कार्यालयाच्या दारासमोर टाकून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.

स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. नाफेडने हरभरा खरेदीचे टार्गेट पूर्ण झाल्यामुळे खरेदी थांबविली. मात्र, शेतकऱ्यांकडे हरभरा तसाच पडून असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. अधिकाऱ्यांच्या दालनापुढे ठिय्या देताना नाफेडच्या मुख्य प्रवेशाद्वाराला कुलूपबंद करण्यात आले.

नाफेडने २२ व २३ मार्च २०२३ दरम्यान हरभरा खरेदीला प्रारंभ केला होता. तेव्हापासून ५ ते ६ दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बहुतांश शेतकरी हरभरा विक्रीसाठी केंद्रावर घेऊन येवू शकले नाहीत. अशातच नाफेडने खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

अमरावती जिल्ह्यात ७५ टक्के शेतकऱ्यांकडे हरभरा घरातच पडून आहे. तर दुसरीकडे नाफेडने खरेदीला ब्रेक लावला आहे. शेतकरी आता दुहेरी कोंडीत सापडला असून, नाफेडने हरभरा खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दालनातच कोंडून ठेवले. या आंदोलनामुळे नाफेड कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांच्या न्यायीक मागण्या सरकारकडे पाठविल्या जातील,असा निर्णय घेण्यात आला.

या आंदोलनात प्रशांत शिरभाते, दिनेश आमले, गौरव ठवळी, राजू वऱ्हाडे, सतिश शेळके, सुरज अढाऊ, अभिजीत ढेरे, प्रेम जवंजाळ, नंदू कपले, स्वप्निल कोठे आदी शेतकरी सहभागी झाले होते. 

जिल्ह्यात अद्यापही ७५ टक्के शेतकऱ्यांच्या घरी चणा पडून आहे. असे असताना चणा खरेदीचे टार्गेट कसे पूर्ण झाले? याचे उत्तर नाफेडचे अधिकारी देऊ शकले नाही. शेतकऱ्यांप्रती शासन-प्रशासनाची अनास्था आहे. त्यामुळे चिडून अधिकाऱ्यांना दालनाच्या बाहेर पडू दिले नाही.

- अमित अढाऊ, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Gram purchase of 'NAFED' stopped; The Swabhimani Shektar Sangathan (Swabhimani Shektar Sangathan) condemned the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.