८४० ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा वर्षभरापासून लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:51+5:302021-04-30T04:15:51+5:30
अमरावती : राज्यात कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतींनी ग्रामसभा स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश १२ मे २०२० रोजी ग्रामविकास ...
अमरावती : राज्यात कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतींनी ग्रामसभा स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश १२ मे २०२० रोजी ग्रामविकास विभागाने काढले होते. सध्या कोरोनाचा कहर वाढतच असल्याने अद्यापही ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. परिणामी जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा गत वर्षभरापासून न झाल्याने गावाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड खोळंबली आहे, तर आराखडा मंजूर होऊन लांबणीवर पडला आहे.
शासन निर्णयानुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. परंतु कोरोना साथीमुळे आर्थिक वर्ष संपत आले तरी एकही ग्रामसभा होऊ शकल्या नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांना खीळ बसली आहे. लाभार्थी निवड खोळंबली १ मे रोजीच्या ग्रामसभेत प्रशासनाकडून अहवाल वाचन होते. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड केली जाते. ही ग्रामसभा होऊ न शकल्याने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेचे लाभार्थी निवडता आलेले नाही. रोजगार हमीचा आराखडा मासिक बैठकीत १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मंजूर केला जातो. पण, ही ग्रामसभा झालीच नाही. योजनेतून गावात कोठे - कोठे विकास कामे करायची यावर चर्चा होऊ शकली नाही. पंचायत समितीकडे हा आराखडा सादर करावयाचा असल्याने सदस्यांच्या मासिक बैठकीत तो मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीत विरोधात असलेल्या सदस्यांच्या प्रभागातील कामे डावलण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित ग्रामसभेत १५ व्या वित्त आयोगाचा सुधारित आराखडा मंजूर केला जातो. हा आराखडा मंजूर करताना ग्रामसभेत सखोल चर्चा होते. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून सुधारित आराखडा मंजूर केला जातो. परंतु ही ग्रामसभा सुद्धा होऊ शकली नाही. त्यानंतर २६ जानेवारीची ग्रामसभा होईल, असे वाटले होते. मात्र, तीही रखडली सध्या कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. जिल्ह्यात आठशेच्यावर दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. शासनाने ग्रामसभाबाबत कोणतेच आदेश काढले नाहीत. मार्च, महिनाही त्यातच गेला. शासकीय आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू झालेले आहे. यामुळे गेले वर्षभर एकही ग्रामसभा झालीच नाही. याचा परिणाम विकासकामावर झाला आहे.
बॉक्स
पदाधिकारी म्हणतील तीच पूर्व दिशा....
गावाच्या विकासासाठी कोणती योजना कुठे घ्यायची? लाभार्थी कुठली निवडायचे, विकासकामे प्राधान्याने कुठली घ्यायची, याबाबत ग्रामसभेत नेहमी चर्चा व्हायची. काहीवेळा ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांच्यात मतभेद व्हायचे. आता ग्रामसभा न झाल्याने सरपंच, उपसरपंच व सदस्य म्हणेल तीच पूर्वदिशा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बॉक्स
तालुकानिहाय ग्रामपंचायत संख्या
अचलपूर ७१, चांदूर रेल्वे ४९, मोर्शी ६७, धामणगाव रेल्वे ६२, वरूड ६६, धारणी ६२, दर्यापूर ७४, अंजनगाव सुर्जी ४९, नांदगाव खंडेश्र्वर ६८, चांदूर बाजार ६६, तिवसा ४५, अमरावती ५९, भातकुली ४८, चिखलदरा तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.