८४० ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा लॉकडाऊनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:33 AM2020-12-04T04:33:50+5:302020-12-04T04:33:50+5:30
अमरावती : राज्यात कोरोनाची लाट येतात ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊ नयेत, असे आदेश १२ मे २०२० रोजी ग्रामविकास ...
अमरावती : राज्यात कोरोनाची लाट येतात ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊ नयेत, असे आदेश १२ मे २०२० रोजी ग्रामविकास विभागाने काढले होते. आता कोरोनाचा कहर हळूहळू कमी होत आहे. परंतु अजूनही ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. यामुळे ग्रामसभा लॉकडाऊनच असून अनलॉकची प्रतीक्षा आहे.
विशेष म्हणजे ग्रामसभा नसल्याने ग्रामविकासाचा वेग मंदावला आहे. शिवाय योजनांच्या लाभार्थ्यांची निवड खोळंबली आहे. आराखडा मंजूर होऊनदेखील लांबणीवर पडला आहे. शासन नियमानुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. पण कोरोना संकटामुळे आर्थिक वर्ष संपत आले तरीही एकही ग्रामसभा होऊ शकलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींमार्फत होणाऱ्या विकासकामांना ब्रेक लागला आहे.
बॉक्स
लाभार्थी निवड खोळंबली
१ मे रोजीच्या ग्रामसभेत प्रशासनाकडून अहवाल वाचन होते. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड केली जाते. ही ग्रामसभा होऊन न शकल्याने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, तसेच शौचालयासाठी लाभार्थी निवडता आलेले नाहीत.
बॉक्स
रोहयाचा आराखडा
रोजगार हमीचा आराखडा मासिक बैठकीत १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत रोजगार हमी योजनेचा आराखडा मंजूर केला जातो. पण ही ग्रामसभा झाली नाही. योजनेतून गाव कुठे, कुठे विकासकामे करायची यावर चर्चा होऊ शकली नाही. पंचायत समितीकडे हा आराखडा सादर करावयाचा असल्याने सदस्यांच्या मासिक बैठकीत तो मंजूर करण्यात आला आहे. २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी आयोजित ग्रामसभेत पंधराव्या वित्त आयोगाचा सुधारित आराखडा मंजूर केला जातो. हा आराखडा मंजूर करताना ग्रामसभेत सखोल चर्चा होते. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून सुधारित आराखडा मंजूर केला जातो. परंतु २ ऑक्टोबरला ग्रामसभा शकली नाही. अशातच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा आराखडा रखडला.
बॉक्स
बजेट मंजुरी लांबणीवर
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेत पुढील आर्थिक वर्षाचे बजेट मांडले जाते. सर्व ग्रामस्थांना याबाबतची कल्पना दिली जाते. मते विचारात घेतली जातात. आवश्यक त्या सूचना करण्यात येतात. ग्रामस्थांच्या परवानगीने पुढील वर्षाचे बजेट अंदाजपत्रक सादर करून ते मंजूर केले जाते. शासनाने अद्यापही ग्रामसभा घेण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आर्थिक बजेट मंजुरी लांबणीवर पडले आहे. जर ग्रामसभांना परवानगी मिळाली तर २६ जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत बजेट मंजूर करून घ्यावे लागणार आहे.
बॉक्स
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
अमरावती ५९, भातकुली ४८, अचलपूर ७१, चांदूर बाजार ६६, मोशी ६७, वरूड ६६, अंजनगाव सुर्जी ४९, दर्यापूर ७४, धारणी६२, चिखलदरा ५५, तिवसा ४५, चांदूर रेल्वे ४९, धामणगाव रेल्वे ६२, नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यात ६८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
कोट
कोविड जन्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासनाची ग्रामसभांना स्थगिती आहे. परंतु अत्यावश्यक असलेली कामे ग्रामसभेच्या अधिन राहून मासिक सभेच्या ठरावानुसार केली जात आहे. याबाबत शासनाच्या पुढील निर्देशानुसार कारवाई केली जाईल.
- अमोल येडगे,
मुख्यकार्यकारी अधिकारी, झेडपी