खरीप नुकसानीपोटी मिळणार अनुदान
By admin | Published: January 15, 2015 10:44 PM2015-01-15T22:44:41+5:302015-01-15T22:44:41+5:30
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासन
अमरावती : पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासन स्तरावरून जिरायती, बागायती व फळबागधारक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. अनुदान वाटपासाठी शेतकऱ्यांची गावनिहाय व बँकनिहाय यादी तयार करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
शासनस्तरावरून नुकसान झालेल्या जिरायत, बागायत व फळबागधारकांना अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी बैठकीत विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले.
त्यानुसार शेतकऱ्यांना जलदगतीने मदत वाटप करण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखून त्याचे नियोजन करावे, शेतकऱ्यांच्या गावनिहाय व बँकनिहाय यादी तयार करून अनुदान वाटपासाठी तहसील स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. अनुदान वाटपासाठी गावस्तरावर मंडळ अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांची परीविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. तहसीलदारांनी स्वत: शेतकऱ्यांच्या सातबारा व आठ ‘अ’नुसार अचूक यादी तयार करून घेत त्याची तपासणी करून खातरजमा करावी व यादी अचूक असल्याचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत अहवाल कार्यालयास सादर करण्याचेही आदेशित केले आहे. तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठीचे अनुदान आयुक्तस्तरावरून उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. (प्रतिनिधी)