प्रगत कृषीतंत्रासाठी शेतक-यांना विदेश दौ-याची संधी, एक लाखापर्यंत मिळणार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 05:18 PM2017-08-28T17:18:46+5:302017-08-28T17:19:02+5:30
प्रगत देशांनी विकसित केलेले कृषीविषयक तंत्रज्ञान व त्याचा शेतीमध्ये अवलंब करून शेती उत्पादनात झालेली वाढ पाहता यासाठी त्या देशातील प्रगत शेतक-यांसोबत येथील शेतक-यांचा प्रत्यक्ष संवाद घडवून याद्वारे शेतक-यांचे ज्ञान वृद्धींगत करणे अन् क्षमता उंचाविण्यासाठी कृषी विभागाद्वारा शेतक-यांच्या परदेश दौ-याचे आयोजन करण्यात येणार आहे.
अमरावती, दि. 28 - प्रगत देशांनी विकसित केलेले कृषीविषयक तंत्रज्ञान व त्याचा शेतीमध्ये अवलंब करून शेती उत्पादनात झालेली वाढ पाहता यासाठी त्या देशातील प्रगत शेतक-यांसोबत येथील शेतक-यांचा प्रत्यक्ष संवाद घडवून याद्वारे शेतक-यांचे ज्ञान वृद्धींगत करणे अन् क्षमता उंचाविण्यासाठी कृषी विभागाद्वारा शेतक-यांच्या परदेश दौ-याचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षाकरीता १५ सप्टेंबरच्या आत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून अर्ज मागविले आहेत.
‘राज्यातील शेतक-यांचे परदेशात अभ्यास दौरे’, या योजनेंतर्गत केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे, हेच ध्येय न राहता उत्पादित शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध योजनांसाठी कृषी विभागाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘राज्यातील शेतक-यांचे अभ्यास दौरे’हा त्याच उपक्रमाचा भाग आहे. यायोजनेत भाग घेण्यासाठी शेतक-यांकडे ‘पारपात्र’ असणे महत्त्वाचे आहे. लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा. त्याच्या नावे सातबारा व आठ ‘अ’ उतारा असणे आवश्यक आहे. उता-यावर नोंदविलेले क्षेत्र पिकाखालील असावे, शेतक-यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेतीच असावे व शेतक-याचे वय २५ ते ६० या दरम्यान असावे, या मुख्य अटी आहेत.
जिल्हास्तरीय समितीद्वारे शिफारस केलेल्या अर्जांची तपासणी केल्यानंतर शेतक-यांना विदेश दौ-यात पाठविण्याचा अंतिम निर्णय राज्याच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आहे. यासाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी शेतक-यांनी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा व विहित प्रपत्रात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
यंदा ईस्त्रायल, जर्मनी, नेदरलँड किंवा आॅस्ट्रेलिया दौरा...
शेतक-यांच्या परदेश अभ्यास दौ-यांतर्गत सन २०१७-१८ करीता इस्त्रायल, जर्मनी, नेदरलँड किंवा आस्ट्रेलिया यापैकी एका देशात शेतक-यांचा दौरा राहणार आहे. यासाठी प्रवास खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा एक लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी शेतक-याजवळ पारपत्र व सातबारा असावा, ही प्रमुख अट आहे.